मराठवाड्यात पूरस्थिती, आठही जिल्ह्यांत पावसाचा कहर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2016 05:50 PM IST

मराठवाड्यात पूरस्थिती, आठही जिल्ह्यांत पावसाचा कहर

02 ऑक्टोबर :  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठा तडाखा दिला असून अतिवृष्टीमुळे लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती ओढवली आहे. मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आल्यामुळे नांदेड आणि लातूर या जिह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसंच अनेक जण पुरात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना वाचवण्यासाठी हॅलीकॉप्टर आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची मदत घेण्यात आली असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात रात्रभर अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यातल्या देगलुर तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या सीमेलगत कर्नाटकच्या काही भागातही मुसळधार पाऊस  झाला आहे. यामुळे लेंडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.

मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील रेणा नदीला मोठा पूर आला असून या पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. नांदेड जिल्ह्यात लिंबोटी धरणाचे १७ दरवाजे उघडल्याने डोंगरगाव इथे २३ गावकरी शनिवारी सकाळी सात वाजेपासून पुरामुळे झाडावर अडकले होते. त्यातील १५ जणांची सुटका करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सात पाझर तलाव फुटल्याने परिसरात हाहाकार उडाला आहे. लातूरमधील भातखेडाच्या पुलावरुन पाणी गेलं आहे. लातूर ते नांदेड दरम्यानची वाहतूक बंद आहे. तसंच, नांदेडकडून सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरुन पाणी गेल्यानं अनेक किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसंच जळकोट तालुक्यात तलाव फुटून पीकांना मोठं नुकसान झाले आहे. उदगीरमध्ये तिरु नदीला मोठा पूर आल्याने जवळपास १५० घरांमध्ये पाणी शिरलं. पानगावातील रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्यामुळे शनिवारी सकाळी नांदेड-बंगळरू एक्स्प्रेस दोन तास पानगाव रेल्वेस्थानकावर थांबवण्यात आली होती.

मांजरा नदी परत धोक्याच्या पातळीपर्यंत

उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या 6 वर्षात पहिल्यांदाच सरासरीपेक्षा जास्त पाऊस  उस्मानाबादमध्ये झाला आहे. जिल्हयात कालपर्यंत 103 मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, जिल्हयातील 8 तालुक्यात जोरदार पाऊस आहे. मांजरा नदी परत धोक्याच्या पातळीपर्यंत पोचली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर भूम तालुक्यातील पांढरेवाडी गावात पुन्हा पाणी शिरलं आहे.

बीड जिल्ह्यालाही मोठा तडाखा

बीड जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड मध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय ठिकठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे. शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असून जवळपास 60 टक्के भाग पाण्याखाली आहे. बीडमधील पाटोदा तालुक्यातील दासखेडमध्ये 4 तलाव फुटल्यामुळे 13 जनावरांसह 6 गोठेही वाहून गेलेत. पेठ बीड भागात बिंदूसरा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी धोकादायक झाली आहे. पूराच्या पाण्यात 30 टपर्‍याही वाहून गेल्यात. दरम्यान जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण केलं आहे. संध्याकाळपर्यंत ही टीम बीडमध्ये पोहोचेल.

जळगावातही मुसळधार

जळगाव जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. भुसावळमधील वरणगाव येथील रामपेठ व अयोध्यानगर भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2016 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close