सांगलीत आज घुमणार '#एकमराठलाखमराठा'चा एल्गार

सांगलीत आज घुमणार '#एकमराठलाखमराठा'चा एल्गार

  • Share this:

ek maratha Lakh maratha

27 सप्टेंबर : मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राच्या पाठोपाठ आज पश्चिम महाराष्ट्रातही मराठ्यांचा एल्गार पहायला मिळणार आहे. सांगली शहरात आज (मंगळवारी) मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाची जय्यत तयारी झाली असून आज सांगलीत विराट संख्येने मराठ्यांचे वादळ धडकणार आहे. जिल्ह्यासह सीमाभागातील मराठा समाजही सांगलीच्या मोर्चात सहभागी होण्याचा अंदाज असून संपूर्ण जिल्ह्यात या मोर्चाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. कसा असेल मोर्चा? किती लोक सहभागी होतील? ही उत्कंठा शिगेला पोचली आहे.

सकाळी 11 वाजता विश्रामबागपासून या मोर्चा सुरुवात होणार आहे. जवळपास 15 लाखांहून अधिक मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळं पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं याबाबतची तयारी केली असून विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

 सांगली जिल्ह्यात आतापर्यंत राजकीय सभांना हजारोंची गर्दी झालेली लोकांनी पाहिली आहे. पण केवळ समाजाच्या मागण्यांसाठी आणि  कोपर्डीतील बलात्काराचा निषेध करण्यासाठी अफाट जनसागर रस्त्यावर येण्याची सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळेच इथल्या राम मंदिर चौक हा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरेल.

दरम्यान, हा मोर्चा जरी सांगली जिल्ह्याचा असला तरी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील मराठा बांधव आणि बेळगावच्या सीमाभागातले मराठा बांधवही या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळं गेल्या महिन्याभरापासून तयारी करण्यात आलेल्या आजच्या मोर्चामध्ये किती मराठा बांधव सहभागी होणार याकडं आता राज्याचं लक्ष आहे.

असा होईल सांगलीतला मराठा क्रांती मोर्चा

- 11.00 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळ सर्व एकत्र येतील

- 11.15वा. शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार

- 11.30वा. मारूती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार

- 11.30वा. क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ

- 12.00वा. मुलींचा गट राजवाडा चौकात येईल

- 12.30वा. निवडक कार्यकर्त्यांसह मुली जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतील

- 1.00वा. मोर्चा राममंदिर चौकात येणार

- 1 वाजल्यानंतर मोर्चाच्या समारोपाचा कार्यक्रम सुरू होईल. यावेळी उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि कोपर्डीतील पीडित मुलीला श्रद्धांजली वाहणार. तसंच आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांनाही श्रद्धांजली वाहण्यात येईल. त्यानंतर सरकारला दिलेले निवेदन वाचून दाखवणार. 3 मुली मनोगत व्यक्त करतील. राष्ट्रगीताने मोर्चा दुपारी दोनच्या सुमारास समाप्त होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: September 27, 2016, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading