23 सप्टेंबर : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेनं 'पाकिस्तानी कलाकार चले जाओ'चा नारा दिलाय. येत्या 48 तासांत भारत सोडा नाहीतर मनसे स्टाईलने खळ्ळ खट्याक देऊ अशा इशारा दिलाय. मात्र, मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी कलाकारांना पूर्ण संरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलंय.
उरीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेनं 48 तासांत भारत सोडा अन्यथा 'खळ्ळ खट्याक' देऊ असा इशारा दिलाय. तसंच महाराष्ट्रभर जिथे कुठे शुटिंग सुरू असेल ते शुटिंगही उधळवून लावू असा इशाराही मनसेचे चित्रपट सेनेचे अमय खोपकर यांनी दिलाय. पाकसोबत आता कोणताही चर्चा नको आणि संबंध नको म्हणूनच पाक कलाकारांनी 48 तासांत आपला गाशा गुंडाळावा अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ असंही खोपकर म्हणाले. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यापुढे पाक कलाकारांना कुणी पाठिंबा देणार नाही. आमचे जवान सीमेवर शहीद होताय आणि इकडे आम्ही पाक कलाकारांना संरक्षण द्यायचं हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिलाय. मनसेच्या या आंदोलनामुळे 'ए दिल है मुश्किल' सिनेमाचं प्रदर्शन धोक्यात आलंय. पाक कलाकार फवाद खानमुळे मनसेनं या सिनेमाच्या प्रदर्शनला विरोध केलाय.
दरम्यान, मनसेच्या राड्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कंबर कसलीये. पाक कलाकारांना कोणताही धोका पोहोचणार नाही. त्यांना पूर्ण संरक्षण दिले जाईल असं स्पष्ट केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv