17 सप्टेंबर : दलितांचे प्रतिमोर्चेच नाहीत तर अति मोर्चे काढू असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलंय.तसंच ब्राम्हण मुख्यमंत्र्यांविरोधात षडयंत्र केलं जातंय. कारण काही जण सत्ता गेल्यानं अस्वस्थ असल्याचा आरोपही आठवलेंनी केलाय.ते नवी मुंबईत बोलत होते.
मराठा क्रांती मोर्चाने अवघा महाराष्ट्र ढवळून निघालाय. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी मागणी या मोर्चेकरांनी केली आहे. कालपर्यंत कितीही मोर्चे काढले तरी ऍट्रोसिटी कायदा रद्द होणार नाही अशी ठाम भूमिका केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला हटवून मराठा समाजाचे प्रश्न मिटणार नाही असं सुचकं वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना कोण हटवतंय असा प्रश्न निर्माण झालाय. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेत विरोधकांवर शरसंधान साधलंय. कोपर्डीनंतर मोर्चे निघणं समजण्यासारखं आहे पण ऍट्रॉसिटीचा उगीच मुद्दा केला जातोय असंही आठवले म्हणाले. मराठा समाजाच्या मुलींवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा आम्हीही मोर्चे काढले. आता मोर्चे उत्स्फुर्तपणे निघत आहे. पण या मागे राजकीय हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही असंही आठवले म्हणाले.
विशेष म्हणजे अनेक दलित नेते विशेषत: प्रकाश आंबेडकरांनी प्रति मोर्चांंना विरोध केलाय. एवढंच नाही तर दलितांचे प्रति मोर्चे हे संघाला, भाजपाला हवे आहेत असा दावाही आंबेडकरांनी केलाय. त्यापार्श्वभूमीवर रामदास आठवलेंच्या वक्तव्याला महत्व आलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा