S M L

गणपती बाप्पा मोरया...गणरायाचं उत्साहात आगमन

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2016 09:19 AM IST

गणपती बाप्पा मोरया...गणरायाचं उत्साहात आगमन

05 सप्टेंबर : गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया.. म्हणत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळणं करत लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. राज्यभरात आपल्या लाडक्या बाप्पा घरी आणण्यासाठी भक्तांनी बाजारात गर्दी केलीय. तर गणेश मंडळाचे मोठे गणपती रस्त्यावरून वाजत गाजत मंडळाच्या दिशेनं निघाले आहे.

घरोघरी बसणाऱ्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली. गणेशमूतीर्ंसोबतच बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झालीये. फुलबाजारातही गर्दी झालीये. तसंच गणपतीबाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांनी गर्दी केलीय. संपूर्ण महाराष्ट्र आज गणेशमय झालाय.

पुण्यात मानाच्या गणपतींचं आगमन


महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी पुण्यात आज गणरायाचं मोठ्या दिमखात आगमन होत आहे. यानिमित्ताने पुण्यात मांगल्य आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पुण्यातील 5 मानाच्या गणपतींची दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा वगळता सर्व चार आणि अखिल मंडई गणेश मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांच्या गणपतींचीही प्राणप्रतिष्ठा दुपारपर्यंत होणार आहे. तत्पूर्वी सर्वच मंडळ श्रींची मिरवणूक काढणार आहेत. या मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यासह विविध पथके सहभागी होणार आहेत. गणपती उत्सवाची सुरुवात झालेल्या पुण्य-नगरीतील मानाच्या गणपतींचीही प्राण प्रतिष्ठा आजच होणार आहे.

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह

संपूर्ण कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह संचारलाय. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचं विशेष महत्त्व असणाऱ्या सिंधुदुर्गातले गणेशभक्त नव्या शेता-भातातून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जातायत. प्रथेप्रमाणे गणरायाची दृष्ट काढून त्याला स्थानापन्न करत आहे. गणपतीच्या सजावटीसाठी लावली जाणारी माटवीही पारंपरिक पद्धतीनेच नव्याने रुजुन आलेल्या पाना फुलांनी सजवली जातेय. महागाईची झळ बसत असली तरीही कोकणात यंदा लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झालेत. आजपासून गौरी गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे पाच दिवस भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.

Loading...

मुंबईतील श्रीमंत जीएसबी गणेशाची प्रतिष्ठापना

तर मुंबईतला सर्वात देखणा आणि श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी गणपतीची ओळख आहे.आज या गणपतीची प्रतिष्ठापनाही मोठ्या उत्साहात करण्यात आली.या गणपतीच्या दागिन्यांसोबतच या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे. ही पूर्ण मूर्ती शाडूची बनलेली असते आणि त्यामुळेच तिच्या सुरक्षेसाठी विशेष काळजीही घेतली जाते. गणेशमूर्तीसमोर दररोज होणा-या वेगवेगळया पूजा यामुळेही हा गणपती खूप प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा अशी त्याची ख्याती आहे .या गणपतीवर चढवले जाणारे दागिने अगदी नेत्रदिपक असतात. हा गणेशोत्सव 5 दिवसांचा असतो. यावरचं वैशिष्ठ्य म्हणजे या गणेशमूर्तीवर 70 किलो सोन्याचे दागिने आणि 470 किलो चांदीचे दागिने सजवण्यात आले आहेत. या दागिन्यांची किंमत 21 कोटी 50 लाख रूपये आहे. 5 दिवसांच्या या गणेशोत्सवात हजारो गणेशभक्त या गणेशाचं दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला रिघ

तर दुसरीकडे राजांचा राजा लालबागचा राजा...नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असेलेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवशी पहाटेपासूनच भक्तांची रिघ लागली आहे. या मंडळाचं 83 वं वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठीच्या तीन रांगा, आणि नवसाची एक रांग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2016 08:48 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close