01 सप्टेंबर : अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाच्या उभारणीला मच्छीमार कृती समितीनं हरित लवादात आव्हान दिलंय. कृती समितीच्या दामोदर तांडेल यांच्यावतीनं वकील असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केलीये. स्मारकामुळे मच्छिमारी धोक्यात येणार असल्याचा दावा मच्छिमारांकडून करण्यात आलाय. स्मारकासाठी निवडण्यात आलेली जागा बेट नसून समुद्रातील खडकाळ जागा असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केलाय.
अरबी समुद्रात प्रस्तावित शिवस्मारकासाठी राज्य सरकारने मिळवलेल्या सगळ्या परवानग्या पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून
घेतल्या आहेत आणि त्याला विरोध करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे केस दाखल केली आहे अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. स्मारकासाठी निवडण्यात आलेली जागा बेट नसून ती फक्त एक खडकाळ जागा आहे. भरती आली की पाण्याखाली जाते आणि ओहोटीच्या वेळी दिसते असंही सरोदे यांनी म्हटलंय.
प्रस्तावित स्मारकाच्या जागी डॉल्फिन आणि इतर मासे नसल्याचा सरकारी दावा खोटा असल्याचा आरोपही सरोदे यांनी केला आहे. तसंच या स्मारकामुळे मच्छिमारांचं अतोनात नुकसान होणार असल्यानं हे स्मारक होऊ नये अशी भूमिका सरोदे यांनी मांडली आहे. स्वतः शिवाजी महाराज पर्यावरणाबद्दल दक्ष होते त्यांनाही असं स्मारक आवडलं नसतं असंही सरोदे यांनी म्हटलंय. यापूर्वीही तांडेल यांनी शिवस्मारकाच्या जागेला विरोध केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv