#‎महाडदुर्घटनाः सावित्री नदीत दोन मृतदेह सापडले

#‎महाडदुर्घटनाः सावित्री नदीत दोन मृतदेह सापडले

  • Share this:

Mahad Pool

रायगड  - 02 ऑगस्ट : महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या प्रवासी आणि वाहनांचा 14 तास उलटून गेले तरीही काही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेतील बचावकार्य वेगाने सुरू झाले आहेत. या दुर्घटनेतील 2 मृतदेह बचावकार्यात सापडले आहेत. या बचावकार्यासाठी नौदल, एनडीआरएफ, कोस्टगार्ड, अग्निशमन विभाग आणि पोलीस अधिकार्‍यांनी बचावकार्यात मदत करत ही शोधमोहीम राबवली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर  राजेवाडी फाट्याजवळचा जुना ब्रिटीशकालीन सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याने दोन बसेससह 12 ते 15 वाहने वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमध्ये सुमारे 22 जण बेपत्ता झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील हा पूल ब्रिटीशकालीन असून, या पुलाला समांतर नवा पुल आहे. ब्रिटीशकालीन पुलावरून मुंबईकडे वाहने येतात. पुलाशेजारी असलेल्या गॅरेजवाल्याला सुरवातीला हा पूल वाहून गेल्याचे समजले. त्यानंतर त्याने प्रशासनाला याबाबतची माहिती दिली.

मंगळवारी सकाळपासून कोकणात जोरदार पाऊस होत असून, सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत पुलावरुन जाणारी वाहने देखील पुरात वाहून गेली आहेत. वाहून गेलेल्या वाहनांमध्ये राजापूर बोरिवली आणि जयगड-मुंबई या दोन बस आणि 5 ते 7 गाड्यांचा समावेश आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी शितल उगले आणि पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम देखील महाडच्या दिशेने रवाना झाली आहे.

आतापर्यंत काय काय घडलं?

- 14 तास उलटूनही एसटी बस आणि खासगी वाहनं बेपत्ताच

- महाड दुर्घटना स्थळापासून समुद्र किनारा 30 किलोमीटर लांब आहे.

- पण सावित्री नदीचा प्रवाह वेग प्रचंड आहे.

- वाहून गेलेल्या एका एसटी चालक मुंढे यांची नदीत बॅग सापडली (ज्यामध्ये मुंडेचा डबा सापडला)

- मध्य रेल्वेची शोधपथक आणि डॉक्टरांची टीम महाडला रवाना, सुरेश प्रभूंनी दिले निर्देश

- बोटींसह 45 जणांची एनडीआरएफची टीम घटनास्थळी

- एनडीआरएफच्या 4 टीम, यात एकूण 115 जणांचा समावेश आणि 12 बोट

- शोध कार्यासाठी स्थानिक रिव्हर राफ्टिंगच्या 7 टीमची मदत

- एकूण चार हॅलिकॉप्टर घटनास्थळी दाखल

दोन्ही बसमध्ये 22 प्रवासी

राजापूर-बोरिवली (एमच-40 एन 1739), जयगड-मुंबई (एमच-20 बीएल- 1538) या दोन बस बेपत्ता आहेत. दोन्ही बसमध्ये प्रत्येकी 9 प्रवासी तसंच चालक-वाहक असे मिळून 22 जण असल्याचे रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

बेपत्ता बसमधील प्रवाशांचा शोध

बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची नावं MH 20BL 1538 - 1) श्री माळप 2) प्रशांत माने 3) सुरोश सावंत 3) सुनिल बैकर 4) स्नेहल बैकर

MH 40 N 9739 1) जे एस बने 2) बाळकृष्ण वरक 3) भिकाजी वागधरे

हेल्पलाइनवर संपर्क साधा

दोन्ही बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे नांव व संपर्क क्रमांक जाणून घेण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 02141-222118 आणि टोल फ्री क्रमांक 1077  या क्रमांकावर संपर्क साधावा. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच सावित्री नदीच्या पुरस्थितीबद्दल अधिकार्‍यांकडून माहिती घेतली आहे.

चिपळूण बस आगारात नातेवाईकांची गर्दी

सावित्री नदीत वाहून गेलेल्या दोन बसेस या चिपळूण आगाराच्या आहेत. या बस दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांनी चिपळूण एसटीच्या आगारात एकच गर्दी केलीये. हे नातेवाईक प्रवाशांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतायेत. चिपळूण आगारातून या बसेस निघाल्या होत्या. जवळपास 18 प्रवाशांनी बस आगारातून मुंबईसाठी प्रवास सुरु केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: August 3, 2016, 3:18 PM IST

ताज्या बातम्या