कल्याणमध्ये लोकलचा डबा घसरला, प्रवाशांचे हाल

कल्याणमध्ये लोकलचा डबा घसरला, प्रवाशांचे हाल

  • Share this:

train derailed

01 आॅगस्ट : कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1ए वरून सीएसटीकडे निघालेली लोकल रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. प्लॅटफॉर्मपासून काही अंतरावरच ट्रेन रूळांवरून खाली घसरली. त्यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरील अप आणि डाऊन दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्यानं नोकरदारांचे हाल होत आहेत. सुदैवानं, गाडीचा वेग कमी असल्यानं कुणीही जखमी झालेलं नाही.

सकाळी 9.43ची कल्याण-सीएसटी लोकल प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडत असतानाच, लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. त्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 1 ए वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. लोकल बंदच पडल्यानं ट्रॅकवरून चालत पुन्हा कल्याण स्टेशन गाठण्याशिवाय प्रवाशांकडे काहीच पर्याय नव्हता. सध्या रेल्वे प्रशासनाकडून ट्रेन पुन्हा रूळांवर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी किती अवधी लागेल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या सगळ्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे.

मध्य रेल्वेवरील आजचं हे दुसरं विघ्न आहे. सकाळी आटगाव-खर्डी स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं कल्याण-कसारा वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, काल धुवाधार पावसामुळे ठाण्यात ट्रॅकवर पाणी साचल्यानं वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. परंतु, रविवार असल्यानं त्याचा फटका चाकरमान्यांना बसला नाही. आज मात्र, त्यांचा प्रवास भलताच त्रासदायक होताना दिसतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2016 12:43 PM IST

ताज्या बातम्या