तुर्कस्तानचं फसलेलं बंड...

तुर्कस्तानचं फसलेलं बंड...

  • Share this:

vinod_raut_ibn_lokmatविनोद राऊत, सिनीअर प्रोड्यूसर, आयबीएन लोकमत 

तुर्कस्तानमध्ये लोकनियुक्त सरकार उलथवून पाडण्याचा लष्कराचा चौथा प्रयत्न फसलेला आहे. मात्र या उठावाने तुर्कीची वाटचाल प्रगल्भ लोकशाहीकडे होईल असं चित्र सध्यातरी दिसत नाही. या उठामागची कारणं, भविष्यातील धोका यावर सविस्तर नजर टाकूयात...

तुर्कीमध्ये लष्कराने उठाव का केला?

तुर्कस्तानमध्ये आजही लष्कराला सेक्युलर संविधानाचे गार्डियन अर्थात संरक्षक समजले जातात. मुस्तफा केमाल अतातुर्क यांनी निधर्मी तुर्कस्तानचा पाया रचला होता, त्याच संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी कमालीच्या निधर्मी असलेल्या लष्करावर सोपवली आहे. तुर्कीमध्ये इस्लामीकरणाचा डाव लष्कराने वेळोवेळी हाणून पाडला आहे. त्याशिवाय कुर्दीश बंडखोराविरुद्धची लष्कराची सात्यत्याची कामगिरी बघता लष्कराबद्दल तुर्कीच्या जनतेमध्ये आदराचं स्थान आहे.

turky34मात्र रेसेप इर्दोगान सत्तेवर आल्यापासून इस्लामीकरणाची प्रक्रिया सुरू झालीय. लष्कराचा त्याला कायम विरोध होता. त्यामुळे लष्कराला कमजोर करण्याची मोहीम इर्दोगान यांनी सत्तेवर येताच सुरू केली. सत्ता उलथवण्याचा कट या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून शेकडो लष्करी अधिकार्‍यांना, पोलिसांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्याशिवाय इर्दोगान यांची अडवणूक करणार्‍या शेकडो न्यायाधीशांनासुद्धा बरखास्त करण्यात आलं. लष्कराला बॅरॅकमध्ये ठेवण्याचा इर्दोगान यांचा प्रयत्न होता, यामुळे लष्करात धुसफूस सुरूच होतीच. आपल्या ध्येयधोरणाला विरोध करणार्‍या मीडियालाही इर्दोगान यांनी सोडलं नाही, त्यांची गळचेपी करण्याचा उद्योग सुरूच होता. त्याहीपुढे जाऊन घटनेत बदल करून शक्तिशाली राष्ट्रपती व्यवस्था आणून सत्ता एकवटण्याकडे इर्दोगान यांची वाटचाल सुरू झाली होती. इर्दोगान यांची लोकप्रियता, सातत्याने जिंकलेल्या निवडणुका त्यामुळे इर्दोगान यांना लष्कराशिवाय आव्हान देणारं कुणी उरलं नव्हतं, त्यामुळे लष्करानं त्यांच्याविरुद्ध बंड केलं...

लष्कराचं बंड का फसलं?

आतापर्यंत तुर्कीच्या लष्करानं केलेला हा चौथा उठाव होता. मात्र यावेळच्या बंडामध्ये लष्करातील सर्व जनरल्स, अधिकारी, सर्व तुकड्यासुद्धा सहभागी झाल्या नव्हत्या. मुळातच या बंडाला सर्व थरातील लष्करी अधिकार्‍यांचा पाठिंबा नव्हता. त्याचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रपती इर्दोगान यांनी अनेक लष्करी अधिकार्‍यांना हटवून आपल्या सोयीचे अधिकारी बसवले होते. अनेक मोठ्या लष्करी अधिकार्‍यांना थेट जेलमध्ये पाठवणार्‍या इर्दोगान यांना आव्हान देण्याची मानसिकता अनेक लष्करी अधिकार्‍यांची नव्हती. त्यामुळे या कटामध्ये हवाई दल, पोलीस ऍकॅडमीचे काही अधिकारी सहभागी झाले होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या बंडाचं नीट नियोजन केलं गेलं नव्हतं.

turky_23बंडाच्या पहिल्या टप्प्यात सर्व महत्त्वाच्या लष्करी तळ, विमानतळ, सरकारी कार्यालयं,पक्षाची मुख्यालयं ताब्यात घेण्यात आली नाही. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना, पंतप्रधानांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न बंडखोरांनी केला नाही. महत्त्वाच्या सरकारी वृत्तसंस्था, वृत्तवाहिन्यांचं प्रक्षेपण लष्करानं सुरूच ठेवू दिलं. म्हणायला सीएनएन तुर्की या वाहिनीचा लष्करानं ताबा घेतला, मात्र त्यांना थेट प्रसारण बंदच करता आलं नाही. काही तासांत ऍपलच्या फेस मीडिया नावाच्या ऍप्सचा वापर करून इर्दोगान यांनी जनतेला रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आणि क्षणार्धातच हजारोंच्या संख्येने इर्दोगान समर्थक रस्त्यावर उतरले, जनतेवर गोळ्या चालवणे कुठल्याही लष्कराला शक्य नाही. त्याहीपुढे इर्दोगान थांबलेल्या हॉटेलवर लष्कर अर्धा तास उशिराने उतरलं, तोपर्यंत ते इस्तंबूल विमानतळावर पोहोचले होते. म्हणजे लष्करानं बंडाचं केलेलं नियोजन अत्यंत ढिसाळ होतं.

लष्करी बंडानंतरची परिस्थिती काय आहे?

कटादरम्यान 264 जण ठार झालेत. यामध्ये उठाव समर्थक आणि विरोधकांचा समावेश आहे तर 1500 पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. तुर्कीमध्ये फसलेल्या बंडानंतर इर्दोगान यांनी मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू केली आहे. ब्लॉग लिहीपर्यंत 35 हजार लोकांना नोकरीवरून बरखास्त करण्यात आलंय, अटकही करण्यात आली आहे. यामध्ये लष्करी जवान, अधिकारी, पोलीस अधिकारी, 3 हजार न्यायाधीश यांचा समावेश आहे. शिवाय घटनात्मक खंडपीठाच्या दोन न्यायाधीशांचा समावेश आहे. आतापर्यंत 30 राज्यपाल, जनरल्स, ऍडमिरल्सला बरखास्त करण्यात आलंय. त्याशिवाय 24 हजार शिक्षकांना , 1577 विद्यापीठातील प्राध्यापकांवर बरखास्तीची कारवाई केली आहे. फताउल्ला गुलेन समर्थक आणि बंडखोरांशी सहानूभूती असल्याच्या आरोपाहून ही कारवाई सुरुच राहणार आहे.ही धरपकड काही काळ सुरूच राहण्याचे संकेत सरकारनं स्पष्टपणे दिलेत.

turky34_23442युरोपियन महासंघात सहभागी होण्यासाठी तुर्कीने काही वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा रद्द केली होती. मात्र या घटनेच्या निमित्तानं राष्ट्रपती इर्दोगान यांनी फाशीची शिक्षा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. तुर्कीने या कटाचा मुख्य सूत्रधार ठरवत पेनेनसिल्वियात निर्वासित म्हणून राहत असलेल्या अताउल्ला गुलेन यांना तुर्कीच्या ताब्यात देण्याची मागणी अमेरिकेकडे केली आहे. या निमित्तानं लष्करात पडलेली उभी फूट स्पष्टपणे दिसली आहे. शरणागती पत्करलेल्या लष्करी जवानांना अत्यंत हीन वागणूक देतानाच चित्र सर्वत्र दिसलंय. ''लष्कराचं बंड हे आमच्यासाठी देवाने दिलेलं वरदान आहे, आता आम्ही लष्कराची साफसफाई करणार", या वाक्यातून इर्दोगान यांचे मनसुबे आपणाला सहज कळू शकतात.

बंड फसल्याने तुर्कीची वाटचाल प्रगल्भ लोकशाहीकडे होईल का?

खरं तर लष्करानं उठाव केल्यानंतर पहिल्यांदाच तुर्कीमध्ये राजकीय एकजुटीचं चित्र दिसलं. लष्कराच्या उठावाला सर्व पक्षांनी एकदिलाने विरोध केला. या एकजुटीचा फायदा घेऊन राष्ट्राध्यक्षांनी देश एकसंध करून लोकशाही अधिक मजबूत करण्याची संधी होती. मात्र दोन दिवसांतच इर्दोगान यांचे मनसुबे स्पष्ट झालेत. मनाचा मोठेपणा न दाखवता त्यांनी या संधीचा फायदा लष्कर, न्यायव्यवस्थेतून विरोधकांचा नायनाट करण्यासाठी सुरू केला आहे. इर्दोगान यांच्या हुकूमशहा पद्धतीच्या वागण्याला अनेक देशवासीयांचा विरोध आहे. उठाव करणार्‍या बंडखोरांना फासावर चढवण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट आहे. उठाव अपयशी ठरल्यानंतर ज्या पद्धतीनं लष्करी जवानांना वागणूक देण्यात आली. त्यामुळे लष्करातला एक वर्ग कायम अस्वस्थ राहणार आहे. त्याशिवाय प्रशासकीय यंत्रणा आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न सत्ताधार्‍यांचा आहे. त्याचा पुढचा टप्पा या व्यवस्थेचं इस्लामीकरण करण्याचा असणार आहे. त्यामुळे सध्यातरी इर्दोगान यांची वाटचाल हुकूमशहा राजवटीकडे सुरू असल्याचं दिसतंय.

तुर्कीमधल्या अस्वस्थतेचा परिणाम आयसिसविरुद्धच्या लढाईवर होऊ शकतो का?

आयसिसविरोधातील लढाईत तुर्की महत्त्वाची भूमिका बजावतोय. सीरियाची मोठी सीमा तुर्कीला लागून आहे, त्यामुळे स्वाभाविकच सीरिया, इराकमध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धाचा मोठा परिणाम तुर्कीवर झालाय. नेमक्या याच काळात कुर्दीश बंडखोरांनीही मान वर काढली आहे. आयसिसवर हल्ला चढवण्यासाठी नाटो, प्रकर्षाने अमेरिकन लढाऊ विमानं तुर्कीचं लष्करी तळ वापरतात. लष्करी उठावावेळी तुर्कीनं अमेरिकन विमानांच्या उड्डाणाला मनाई केली होती. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे निर्वासितांचा लोंढा मोठ्या प्रमाणात युरोपच्या दिशेने वळला होता. हा लोंढा थांबवण्यासाठी युरोपने तुर्कीची मदत घेतली आहे. निर्वासितांना सामावून घेण्यासंदर्भात युरोप-तुर्कीमध्ये करारसुद्धा झालाय. युरोपमधून सीरियात जाणार्‍या शेकडो जिहादी तरुणांना तुर्कीने परत पाठवलंय किंवा त्यांची माहिती युरोपला पुरवली आहे.

turky424324रमजानच्या काळात इस्तंबूल विमानतळावर झालेला बॉम्बस्फोट, शहरात झालेले बॉम्बस्फोट बघता तुर्की दहशतवादाच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालंय. अशावेळी या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारं तुर्कीचं लष्कर मात्र दुभंगलेल्या अवस्थेत दिसतंय. विशेषत: लष्करी उठावानंतर लष्करातील एक मोठा घटक अस्वस्थ आणि मनोधैर्य गमावलेल्या परिस्थितीत आहे. त्याचा परिणाम दहशतवादविरोधातील लढाईवर होणार हे स्पष्ट आहे. नाटो, युरोपियन महासंघ आणि अमेरिकेनं इर्दोगान यांनी सुरू केलेली धरपकड, दडपशाहीचा जाहीर निषेध केलाय. त्यामुळे आपल्या वागण्याच्या पद्धतीत बदल न केल्यास त्याचे परिणाम तुर्कस्तानच्या युरोप, अमेरिकेच्या संबंधांवर होतील - प्रकर्षाने दहशतवादाविरोधातल्या लढाईवर होईल.

लष्करी उठाव मोडून काढल्यावर राष्ट्राध्यक्ष इर्दोगान यांची सत्तेवरची पकड मजबूत झाली आहे?

सातत्याने निवडणुका जिंकणार्‍या रेसेप इर्दोगान यांनी या निमित्तानं आपली सत्तेवरची पकड मजबूत केली आहे. त्यांची लोकप्रियता खूप मोठी आहे, त्यांच्या एका हाकेवर हजारो जनता रस्त्यावर उतरली. मात्र यामध्ये त्यांच्या समर्थकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर होता. 85 हजार मशिदीवरून बंड मोडून काढण्याचं आवाहन करण्यात आलं, यावरून इर्दोगान यांची धार्मिक पकड दिसून येते. मात्र लष्कराचे अधिकार काढण्याची आणि दडपशाही करण्याची प्रक्रिया कित्येक वर्षांपासून राबवूनही लष्करानं बंड केलंच. यावरून इर्दोगान यांच्याविरुद्ध एक मोठा वर्ग आहे हेसुद्धा स्पष्ट झालंय. अशीच दडपशाही सुरू ठेवल्यास इर्दोगान यांच्याविरुद्ध हळूहळू असंतोष निर्माण होईल. त्याहीपुढे दहशतवादाविरोधातील लढाई पुढे नेण्यासाठी त्यांना सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल. त्यांच्यापुढील सर्वात मोठं आव्हान ते कसं निभवतात त्यावर त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

या उठावाचा मास्टरमाईंड खरंच फताउल्ला गुलेन आहे का?

फताउल्ला गुलेन हे तुर्कीमधील लोकप्रिय मुस्लीम धर्मगुरू आहेत. 1999 मध्ये तत्कालीन तुर्की सरकारविरुद्ध कारवाईचा आरोप झाल्यानंतर गुलेन यांना तुर्की सोडून अमेरिकेत पळ काढावा लागला होता. गुलेन हे स्वयंघोषित धर्मगुरू आता पेनसिल्वेनिया राज्यात विजनवासात राहतात. मात्र तुर्कीच्या अनेक घटकांवर विशेषत: शिक्षण, पोलीस, न्यायव्यवस्थेवर त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. गुलेन यांच्या शिक्षण संस्था जगभर पसरलेल्या आहेत. त्या माध्यमातून ते आधुनिक इस्लामची शिकवण देतातgulen433. या माध्यमातून त्यांचा आजही तुर्कीच्या व्यवस्थेवर प्रभाव कायम आहे. महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी इर्दोगान यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. मात्र पुढे त्यांचे इर्दोगान यांच्यासोबतचे संबंध बिघडले, ते टोकाला गेले. त्यानंतर इर्दोगान यांनी गुलेन यांच्यावर सातत्यानं सरकार उलथवून लावण्याचा आरोप केला. अमेरिकेकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली, मात्र पुरेसे पुरावे नसल्याचं कारण देत अमेरिकेनं गुलेन यांना परत पाठवण्यास कायम नकार दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: July 20, 2016, 7:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading