आशिष शेलार मनोरुग्ण, 'सामना'तून सेनेचं टीकास्त्र

  • Share this:

मुंबई- 27 जून : शिवसेना आणि भाजपमध्ये शोलेगिरी वादावर अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचं मुखपत्र 'सामना' मधून आज पुन्हा भाजपचा खास ठाकरी शैलीत समाचार घेण्यात आलाय. सामना जाळण्याची भाषा करणारे आशिष शेलार यांना मनोरुग्णाची उपमा देण्यात आलीये. तसंच पंतप्रधानांनी अशा वेड्यांसाठी प्रत्येक स्मार्ट सिटीमध्ये वेड्याचे हॉस्पिटल उघडावे असा टोलाही लगावण्यात आलाय. एवढंच नाहीतर शेलार यांच्यावर मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात आणण्याचा डाव आहे असा आरोपही सेनेनं केला.

sena samna on shelarभाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल शिवसैनिक भाजपचं पाक्षिक 'मनोगत' जाळत असतील तर त्यांचे मुखपत्र जाळण्याचा अधीकार आम्हाला असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी शिवसेनेनं तयार रहावं असं आव्हान दिलं. त्यावर आज अपेक्षेनुसार, सामनामधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झालीये. मनोरूग्णांचं मनोगत या शीर्षकाखाली लिहिलेल्या अग्रलेखामध्ये सामना जाळणार्‍यांना मनोरूग्ण ठरवण्यात आलंय. इतकंच नाही तर स्मार्ट सिटीचा प्रसार करणार्‍या पंतप्रधानांनी प्रत्येक शहरामध्ये वेड्यांची हॉस्पिटल्स उघडावीत असा सल्लाही या अग्रलेखात देण्यात आलाय. तसंच अशा वाचाळवीरांमुळे मुख्यमंत्र्यांची खुर्चीही धोक्यात असल्याचं सामनाच्या अग्रलेखात लिहीलं आहे.

काय म्हटलंय 'सामना'त ?

सत्य सांगणार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचे प्रकार दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत वाढू लागले आहेत. यालाच सत्ता डोक्यात जाणे असे म्हणतात. गेल्या पन्नासेक वर्षांत दिल्लीश्‍वरांच्या फुसखोरीने आणि येथील थैलीवाल्यांच्या मदतीने अनेकांनी शिवसेना संपविण्याचे विडे उचलले, पण ते अफझलखान, शाहिस्तेखानाप्रमाणे आडवेच झाले. सामना जाळू असे मनोगतही यापैकी काही मनोरुग्णांनी व्यक्त केल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील अग्निशमन दले सज्ज झाल्याच्या अफवा पसरवल्या आहेत.

या अस्तनीतल्या दलालांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेचले पाहिजे. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्‍वास आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीलाही सुरुंग लावण्याचे हे कारस्थान आहे. सामना जाळण्याची भाषा करणे म्हणजे मोदींच्या मूळ विचारसरणीची कत्तल करणे होय. आतापर्यंत पाकडे, मुस्लिम लीग, ओवेसीची एमआयएम आणि धर्मांधांची तळी उचलणारे काँग्रेससारखे लोक सामना जाळत होते.

पण आता स्वत:स हिंदुत्ववादी म्हणवून घेणारेही तेच करत असतील तर हा मूर्खांचा बाजार आहे. त्यामुळे प्रत्येक स्मार्ट सिटीत किमान पाच-दहा वेड्यांची इस्पितळे उभारण्याची शिफारस आम्ही सरकारकडे करीत आहोत.

सामनाच्या या अग्रलेखावर आशिष शेलार यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली. ते म्हणता, "वा छान ! पंतप्रधानांच्या राष्ट्र उभारणीत, मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचार मुक्तीच्या कार्यात सामनाने असेच पाठीशी सदैव उभे रहावे हेच आमचे मनोगत!"

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2016 02:10 PM IST

ताज्या बातम्या