सांगली - 11 एप्रिल : दुष्काळाने होरपळणार्या लातूरकरांची तहान भागवण्यासाठी मिरजेहुन वॉटर एक्स्प्रेस निघाली आहे. साडे पाच लाख लिटर पाणी घेऊन ही वॉटर एक्स्प्रेस आज लातूरमध्ये दाखल होणार आहे.
भीषण दुष्काळामुळे लातूरमध्ये पाणीबाणी लागू झालीये. त्यामुळे लातूरकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारने वॉटर एक्स्प्रेसने पाणी पुरवण्याचा निर्णय घेतला. रविवारी 10 टँक ची वॉटर एक्स्प्रेस लातूरमध्ये दाखल झाली. काल दुपारपासून पहाटेपर्यंत पाणी भरण्याची प्रक्रिया पार पडली. अखेर आज सकाळी हे काम पूर्ण झालं.
लातूरला पाणी घेऊन ही पहिली रेल्वे गाडी मिरजहून रवाना झालीये. या गाडीला 10 टँकर आहेत. प्रत्येक टँकरची क्षमता 54 हजार लीटर एवढी आहे. म्हणजे एकूण साडे पाच लाख लीटर पाणी आज लातूरमध्ये नेण्यात येतंय. कोट्याहून अनेक टँक आलेले आहेत. पण मिरजेत पाणी भरायलाही वेळ लागतोय. त्यामुळे 10 टँक भरल्यावर ते पुढे नेण्याचा निर्णय लातूरच्या जिल्हाधिकार्यांनी घेतला. 8 ते 9 तासांत ही गाडी लातूरमध्ये दाखल होईल. लातूरला पोहोचल्यावर हे पाणी मोठ्या टाक्या आणि विहिरींमध्ये सोडलं जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
Follow @ibnlokmattv