किंमत देत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, राज ठाकरेंचं सेनेला आव्हान

किंमत देत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, राज ठाकरेंचं सेनेला आव्हान

  • Share this:

raj_thackery_banner3मुंबई - 08 एप्रिल : सत्तेत राहायचं आणि रुसबाई रुसबाई करायचं. सत्तेतही राहायचं आणि विरोधक म्हणूनही दाखवायचं. अरे जर किंमत देत नसेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा असं आव्हानाचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला दिलं. तसंच भारत माता की जय न म्हणणार्‍या असाउद्दीन ओवेसीने महाराष्ट्रात यावं मानेवर सुरा फिरवून दाखवतो. पण, मुळात भाजपच ओवेसींना पैसा पुरवत आहे. त्यामुळे हा वाद पेटवला जातोय असा आरोपही राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्र हा काही तुमच्या बापाचा माल नाही. काहीही झालं तरी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही अशा शब्दात राज ठाकरे यांनी भाजप आणि संघाला सुनावले.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच मनसेचा मेळावा शिवाजी पार्कवर मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ चौफेर धडाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप, संघ आणि शिवसेनेवर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याच्या काही दिवसांआधी शिवसेनेनं या परिसरात झेंडे लावले. अशा या राजकारणामुळे त्यांची मला कीव येते. मुळात मेळाव्याआधी सेनेचे झेंडे हे मला बाळासाहेबांचा आशीर्वाद होता असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.

 राम मंदिराचं आंदोलन अर्धवट कुणी सोडलं?

मनसेवर अर्धवट आंदोलन सोडण्याचा आरोप केला जातो पण आम्ही कोणते अर्धवट आंदोलन कधी सोडले ? मोबाईल कंपन्यांविरोधात, मराठी पाट्या असो, रेल्वेच्या नोकरीत स्थानिकांना जागा असो किंवा मराठी सिनेमांना मल्टिप्लेक्समध्ये स्क्रिन मिळवून देण्याचं आंदोलन हे मनसेनेच केलं आहे. अलीकडे टोलचं आंदोलनही मनसेनं केलं म्हणून 56 टोलनाके बंद झाले असा दावाही राज ठाकरे केलं. आमची आंदोलना मोजताय मग राम मंदिराचं आंदोलन अर्धवट का सोडलं ?,जैतापूर आंदोलनाचं काय झालं ? का आंदोलनं अर्धवट सोडली असा खडासवाल राज ठाकरेंनी भाजप आणि सेनेला केला.

'नरेंद्र मोदी नुसत्या भुलथापा देता'

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफांना केक भरवता. हे होत नाही तेच पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला होतो.

कसलं हे तुमचं धोरणं ? एकीकडे जेएनयूमध्ये कन्हैया कुमार काय बोला हे अजून स्पष्ट झालं नाही. तर तो देशद्रोदी ठरवला गेला. पण, ज्या अफझल गुरूवरून हा वाद पेटला त्याच अफझल गुरूचा ठराव पीडीपीने मांडला होता. मग पीडीपीशी युती का केली ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थिती केला. निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींचं मी कौतुक केलं होतं. पण, पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी बदलले. जे काँग्रेसने केलं तेच निर्णय तुम्ही राबवत आहे. अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं पण कुठे आहे अच्छे दिन?, काळा पैसा आणणार होते तो कुठे आहे ?. नरेंद्र मोदी नुसत्या भुलथापा देताय अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. तसंच स्वच्छता अभियानाची सुरुवात तुम्ही केली पण, इथं राज्यात गाडगेबाबांनी ती कधीच केली होती. जर स्वच्छ अभियान राबवायचे असेल तर गाडगेबाबांच्या नावाने राबवा असंही राज ठाकरे म्हणाले.

'ओवेसींना भाजप पैसा पुरवतो'

'भारत माता की जय' हा वाद विनाकारण उकरला गेलाय. भारत माता की जय आपण कधी म्हणतो जेव्हा एखादी सभा असेल, कार्यक्रम असले तर त्यावेळी म्हणतो. कधी तुम्ही घरातून ऑफिसला निघाला तेव्हा भारत माता की जय अशी घोषणा देता का ? पण भाजप आणि संघाकडून हे पेटवलं जात आहे. लोकांकडून वदवून घेतलं जात आहे. देशभक्तीचं सर्टिफिकेट संघाने देऊ नये. संघाच्या आड भाजप हे राजकारण करत आहे. त्यांच्या या राजकारणाचा ओवैसी सारखे नेते फायदा घेत आहे. म्हणे सुरा फिरवला तरी भारत माता की जय म्हणणार नाही. इकडं येऊ न दाखवं सुरा फिरवून दाखवतो अशी टीकाही राज ठाकरेंनी केली. तसंच भाजप आणि संघाने काही पेरायचं आणि ते ओवेसींनी पेटवायचं हे सगळं ठरलेलं आहे. या सगळ्यांसाठी भाजपच ओवेसींना पैसा पुरवतो असा आरोपही राज ठाकरेंनी केला. तर दुसरीकडे आपले मुख्यमंत्री म्हणे, मंत्रिपद गेले तरी भारत माता की जय म्हणणारच, अरे पण तुम्हाला राजीनामा कोण मागणार आहे. राज्यात दुष्काळ पडलाय त्याकडे लक्ष्य द्या असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

'महाराष्ट्र तुमच्या बापाचा माल नाही'

वेगळा विदर्भाची मागणी करता पण याच विदर्भाकडे 15 वर्ष मुख्यमंत्रीपद होते. विदर्भाचे तीन मुख्यमंत्री झाले तरीही विकास का झाला नाही ? हा काय महाराष्ट्राचा दोष आहे का ? महाराष्ट्राचे तुकडे करून तुम्हाला काय मिळणार आहे. कालपर्यंत विदर्भाची मागणी केली जात होती. आता वेगळ्या मराठवाड्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र हा काय तुमच्या बापाचा माल वाटलाय का ? काहीही झालं तरी राज्याचे तुकडे होऊ देणार नाही. जर संघाला राज्याचे तुकडे करायचे असेल तर गुजरातचे करून दाखवा असं थेट आवाहनही राज यांनी केलं.

'आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करा'

ज्या प्रमाणे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली त्याच प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही मोठ्या जल्लोषाने साजरी करा. पुढील महिन्यात सावरकारांचीही जयंती आहे ती सुद्धा जल्लोषाने साजरी करा असा आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: April 8, 2016, 9:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading