देवनारची आग म्हणजे शिवसेनेला बदनाम करण्याचा कट - रामदास कदम

देवनारची आग म्हणजे शिवसेनेला बदनाम करण्याचा कट - रामदास कदम

  • Share this:

Ramdas Kadam12131

मुंबई – 21 मार्च : देवनार डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग लागण्याच्या घटनांमागे शिवसेनेला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

तर दुससरीकडे, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील आगीच्या या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. कचराव्यवस्थापन न झाल्याचा हा पुरावा आहे, असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. तसंच, केंद्रीय पथक आता याठिकाणी पाहणीसाठी पाठवण्यात येणार असून या पथकाच्या अहवालात ही आग निष्काळजीपणामुळे लागल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात येतील, असं जावडेकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबईतल्या देवनार डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीसंदर्भात एफआयआर नोंदवला जाईल अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली आहे. त्याचबरोबर, संपूर्ण डंपिंग ग्राऊंडवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

देवनार कचरा डेपोला पुन्हा काल (रविवारी) दुपारी दोनच्या सुमाराला लागलेली आग अजूनही धुमसतच आहे. कचर्‍याला आग लागल्याने निर्माण झालेल्या धुराने देवनारच्या आसपास राहणार्‍या अनेक नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. पैसे मिळवण्याच्या हेतूनंच इथले स्थानिक राजकारणी आणि माफिया यांनी हातमिळवणी केल्याचा आरोप इथले स्थानिक नागरिक करतायेत. पण त्यामुळे नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलं आहे. सध्या या ठिकाणी अग्निशामन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2016 09:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading