परवाने मिळालेल्या नव्या रिक्षा जाळून टाका -राज ठाकरे

परवाने मिळालेल्या नव्या रिक्षा जाळून टाका -राज ठाकरे

  • Share this:

raj_thackery_mns10मुंबई - 09 मार्च : "उद्या परवाने मिळालेल्या नव्या रिक्षा रस्त्यावर दिसल्या तर प्रवाशांना खाली उतरवा आणि रिक्षा जाळून टाका" असा आदेशच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. तसंच न्यायाधीश आपल्याला हवे तसे निर्णय देतात. न्यायाधिशांनी आपल्या कक्षेत राहावं अशी टीकाच राज ठाकरे यांनी केली. वर्धापन दिनाच्या भाषणात राज ठाकरेंनी चिथावणीखोर वक्तव्य करून नव्या वादाला आता तोंड फोडलंय.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा 10 वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना 10 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले. निवडणुका येतील आणि निवडणुका जातील पण खचून जाऊ नका. अटलबिहारी वाजपेयी यांनाही अपयश आलं होतं. पण, भाजप पक्ष आज मोठा झालाच. आपली तर आणखी सुरूवातच आहे. त्यामुळे खचून जाऊ नका अशी समजूत कार्यकर्त्यांची काढली. तसंच यापुढे इंजिन आता रूतू देणार नाही अशी ग्वाही देत आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्नही केला. मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, अनेकांचा हिशेब मांडायचाय पण 8 एप्रिलला शिवतीर्थावर तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार असं राज ठाकरेंनी जाहीर केलं.

'न्यायाधिशांनी कक्षेत राहावं'

राज्यात रिक्षासाठी मराठी बोलण्याची सक्ती करण्यात आलीये. तसा तो कायदाच आहे. पण कुणीतरी उठलं आणि कोर्टात याचिका दाखल केली. यावर नागपूर खंडपीठातील न्यायाधिशांनी मराठी बोलण्याची सक्तीच कशाला ? असा सवालच उपस्थिती केला. हा महाराष्ट्र आहे आणि इथं मराठीतच बोललं पाहिजे. न्यायाधीश आपल्याला हवे तसे निर्णय देतात. पण, तुमच्यावर असलेला लोकांचा आदर हा टिकवावा याची न्यायाधिशांनी काळजी घेतली पाहिजे. ही काही मोगलाई नाही अशी टीकाच राज यांनी न्यायाधिशांवर केली.

 

'नव्या रिक्षा जाळून टाका'

राज्य सरकारने 70 हजार रिक्षा परवाना वाटपाची घोषणा केलीये. यासाठी आता परीक्षा घेणंही सुरू आहे. मुळात 70 हजार रिक्षा वाटपाची घोषणा केलीच कशाला ? यात 70 टक्के रिक्षा या परप्रांतियांना दिल्या जाणार आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

एका रिक्षाची किंमत ही 1 लाख 70 हजार रुपये आहे. एका रिक्षाच्या किंमतीप्रमाणे एकूण 1190 कोटींचा व्यवहार होणार आहे. नेमकं याचवेळी या राहुल बजाज यांच्या बजाज ऑटोमध्ये सगळ्या रिक्षाचा लॉटही तयार आहे. यामागे गौडबंगाल काय आहे ? भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करणार्‍या भाजप सरकारने 70 हजार रिक्षा परवाना देण्याची घोषणा केली खरी पण ती कशासाठी केली ?, एकीकडे घोषणा करायची आणि बजाज ऑटोमध्ये लगेच 70 हजारांच्या रिक्षाही तयार कशा ? याचं मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी करत उद्या परवाने मिळालेल्या नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्या तर प्रवाशाला खाली उतरवा आणि रिक्षा जाळून टाका असा आदेशच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या शेवटला गेल्या दहा वर्षांत यशात पराभवात सर्वांनी साथ दिली. त्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि आपल्या कुटुंबांचे आभारीही मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2016, 10:10 PM IST

ताज्या बातम्या