डेव्हिड हेडलीची मुंबई कोर्टात अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष

डेव्हिड हेडलीची मुंबई कोर्टात अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष

  • Share this:

मुंबई - 08 फेब्रुवारी : 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासंबंधी आज (सोमवार) महत्त्वाचा दिवस आहे. या हल्ल्यातला महत्त्वाचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईच्या कोर्टात साक्ष सुरू आहे. डेव्हिड सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. तिथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही साक्ष होतेय. या खटल्याशी संबंधित अमेरिकेचे अधिकारी यासाठी आधीच मुंबईत दाखल झाले आहेत. तेही मुंबईच्या कोर्टात हजर आहेत. साडेसात वाजता ही साक्ष सुरू झाली आहे. दुपारी साडेबारापर्यंत ही साक्ष चालेल.

david_headley_2611भारताच्या न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच एका परदेशी दहशतवाद्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष होणार आहे. हेडलीची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण असेल. कारण त्यामुळे अजूनही माहित नसलेल्या या कटासंबंधीच्या अनेक गोष्टी उघड होतील असं सरकारी वकील उज्जवल निकम यांनी सांगितलं.

26/11 हल्ल्यापूर्वी हेडली भारतात येऊन संभाव्य हल्लास्थळांची पाहणी करुन गेला होता. सध्या हेडली अमेरिकी तुरुंगात आहे. अमेरिकी कोर्टाने त्याला 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याच्या दृष्टीनं हेडलीची साक्ष अतिशय महत्त्वाची आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यामध्ये लष्कर ए तोयबाबरोबरच आयएसआयचाही हात होता अशी माहिती हेडली आज कोर्टासमोर देईल अशी अपेक्षा आहे.

या हल्ल्यामध्ये 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं. कसाबनं दिलेल्या साक्षीमध्ये लष्कर ए तोयबाकडून प्रशिक्षण घेतल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे या हल्ल्यामागे लष्करचा हात असल्याचं सिद्ध झालं तरी आयएसआयपर्यंत पोहोचता आलं नव्हतं.

आता डेव्हिड हेडलीनं आयएसआयच्या सहभागाची माहिती दिली तर या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता असं सिद्ध करणं शक्य होईल. आतापर्यंत आयएसआय आणि पाकिस्ताननं कायमच हल्ल्यामागे आपला हात असल्याचं नाकारलं आहे.

हेडलीकडून मिळणार्‍या पुराव्याचे महत्व अधोरेखित करताना निकम म्हणाले की, हेडलीकडून मिळणारे पुरावे दोन कारणांसाठी महत्वपूर्ण आहेत. भारतातील एक दहशतवादी अबू जिंदाल पाकिस्तानात असून त्याच्या विरोधातील खटला प्रलंबित आहे. त्यामुळे हेडलीच्या साक्षीमुळे या खटल्याच्या सुनावणीवर व्यापक परिणाम होणार आहे तसंच हा कट का रचला ? तसेच या कटामागे कोणकोण आहेत त्यावरही प्रकाश पडणार आहे.

कोण आहे डेव्हिड कोलमन हेडली ?

- मूळ नाव दाऊद सईद गिलानी, वडील पाकिस्तानी

- 1960 साली अमेरिकेत वॉशिंग्टन इथं जन्म

- 1999 : लष्कर-ए-तोयबात सामील

- 2005 : साजिद मीरच्या सल्ल्यानुसार नाव बदललं

- 2007-2008 या काळात पाच वेळा मुंबईत आला

- ताज हॉटेलमध्ये राहून विविध ठिकाणांची पाहणी केली

- माहिती गोळा करून लष्कर-ए-तोयबाला पुरवली

- याच माहितीच्या आधारे 26/11चा हल्ला करण्यात आला

- ऑक्टोबर 2009 साली अमेरिकेत शिकागो इथं अटक

- मार्च 2010 मध्ये गुन्ह्यांची कबुली दिली

- जानेवारी 2013 मध्ये 35 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली

- पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटांमध्येही होता सहभाग

डेव्हिड कोलमन हेडलीची साक्ष - घटनाक्रम

- डेव्हिड कोलमन हेडलीवर 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप

- हा आरोप अमेरिकी कोर्टात सिद्ध होऊन त्याला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली

- पाकिस्तानात 2002-05 या कालावधीत 5 वेळा लष्कर-ए-तोयबाकडे प्रशिक्षण घेतल्याची अमेरिकी कोर्टासमोर कबुली

- अमेरिकेचा त्याला भारताच्या ताब्यात द्यायला नकार

- डेव्हिड हेडली सध्या अमेरिकेच्या तुरुंगात

- 10 डिसेंबर 2015 रोजी मुंबई कोर्टाची डेव्हिड हेडली माफीचा साक्षीदार होण्याची परवानगी

- त्यामुळे या गुन्ह्यासाठी मुंबई कोर्टात डेव्हिडवर आरोपी म्हणून खटला चालणार नाही

- अशा प्रकारे भारतीय कोर्टात एखाद्या परदेशी दहशतवाद्याची साक्ष नोंदवली जाण्याची ही पहिलीच घटना

- 26/11च्या हल्ल्याचा कट आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे याबद्दल हेडली माहिती देईल

- लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआयच्या सहभागाबद्दल हेडली तपशीलवार माहिती देण्याची अपेक्षा

- सध्या याच कोर्टात अबू जुंदाल या महत्त्वाच्या सूत्रधारावर खटला सुरू

कोर्टाच्या हेडलीला अटी

- हल्ल्याशी संबंधित सर्व घटनाक्रम आणि तंतोतंत सत्य परिस्थिती सांगावी

- स्वत:ची भूमिका तपशीलवार स्पष्ट करावी

- लष्कर-ए-तोयबासह इतर दहशतवादी संघटनांचा तपशील सांगावा

- सरकारी वकिलांकडून विचारल्या जाणार्‍या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 8, 2016, 8:46 AM IST

ताज्या बातम्या