पठाणकोट हल्लाप्रकरणी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझर ताब्यात

पठाणकोट हल्लाप्रकरणी 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझर ताब्यात

  • Share this:

CYmirEBU0AAKO4d

13 जानेवारी : भारतीय संसदेवर हल्ला करणारा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याला आज पाकिस्तानात पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच जैशच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकत पाक सरकाने या ठिकाणांना सील ठोकलं आहे. पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने सक्रियता दाखवत जैश-ए-मोहम्मदच्या तीन संशयित दहशतवाद्यांना आज सकाळी अटक केली. पाकिस्तानी मीडियाने ही माहिती दिली. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाक सरकारने केलेली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक झाली. या बैठकीत सविस्तर आढावा घेतल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सरकारने उघड केली, तसंच पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तान आपले तपास पथक भारतात पाठवण्यात येईल, अशी माहिती नवाज शरीफ यांच्या कार्यालयाने एका पत्रकद्वारे दिली आहे.

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर कारवाई करावी, यासाठी भारताने दबाव वाढवला होता. हल्ल्याबाबत भारताने पाकिस्तानला महत्त्वाचे पुरावे सोपवले होते. तसंच अमेरिकेने पाकिस्तानला तंबी दिली होती. पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर दोन जानेवारीला दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात भारताचे 7 जवान शहीद झाले होते.

पाकिस्तानने ही कारवाई करतानाच पठाणकोट हल्ल्यातील या दहशतवादी संघटनेच्या सहभागाचे आणखी पुरावे भारताकडे मागितले आहेत. एसआय़टी स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची शक्यताही पाकिस्तानी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तान दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी बांधिल असल्याचा दावाही या अधिकार्‍यांनी केला.

तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त तपास पथक नेमलं असून, भारताने सुपूर्द केलेल्या धागेदोर्‍यांवरून तपास करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आले आहेत. पाकिस्तानी यंत्रणांनी दोन दिवसांपूर्वी गुजरानवाला, झेलम आणि बहावलपूरमध्ये पठाणकोट हल्ल्यासंदर्भात छापे टाकले होते. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. शरीफ यांनी याआधीच पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पारदर्शकता राहिल याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर, दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही असंही पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे. तर भारताने पठाणकोट हवाई तळावरून हल्लेखोराकडून संपर्क साधण्यात आलेला पाकिस्तानी दुरध्वनी क्रमांक पाककडे सुपूर्द केला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 13, 2016, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading