फ्लॅशबॅक 2015 : आयलन, पॅरिस हल्ला, नेपाळ भूकंप आणि आयसिसचा उच्छाद !

फ्लॅशबॅक 2015 : आयलन, पॅरिस हल्ला, नेपाळ भूकंप आणि आयसिसचा उच्छाद !

  • Share this:

flash back international34सीरियाचा आयलान कुर्दी आणि पॅरिसवर दहशतवादी हल्ला...आयसिसने केलेल्या दहशतवादी कारवाया...आणि नेपाळमध्ये आलेला महाप्रलयकारी भूकंप...अशा अनेक घटनांनी जग हादरून सोडले. जगभरातील वर्षभरात घडलेल्या घडामोडींचा हा आढावा...

चिमुकला आयलन...

यावर्षी सगळ्यांनाच हेलावून गेला तो सीरियाच्या चिमुकल्या आयलान कुर्दीचा चेहरा..भूमध्य समुद्रातून स्थलांतर करणार्‍या आयलानच्या कुटुंबीयांची बोट टर्कीच्या किनार्‍यावर उलटली आणि आयलानचा मृत्यू ओढवला. आयलानच्या मृत्यूनंतर जगभराला स्थलांतरितांच्या यातना कळल्या. सीरिया, इराक, लिबिया या युद्धग्रस्त देशांतून यावर्षी लाखो लोकांनी युरोपमध्ये स्थलांतर केलं. जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, ग्रीस या देशांना या स्थलांतरितांना सामावून घेण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखाव्या लागल्या. स्थलांतरितांचे प्रश्न सोडवण्यासाठी युरोपियन युनियनच्या अनेक बैठका झाल्या आणि तरीही स्थलांतरितांचे प्रश्न सुटलेले नाहीत.

पॅरिस दहशतवादी हल्ल्याने हादरलं

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अवघं जग हादरून गेलं. 13 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी पॅरिसमध्ये सहा ठिकाणी आत्मघातकी हल्ले केले. या अतिरेक्यांनी बंदुकीच्या अंदाधुंद फैरी झाल्या. अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात 130 नागरिकांचा बळी गेला तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत. या हल्ल्यानंतर फ्रान्स सरकारने आणीबाणी जाहीर केली. हे हल्ले आयसिसने घडवून आणले. फ्रान्सवरचा आत्तापर्यंतचा हा सर्वात भीषण हल्ला होता.या हल्ल्याचा बदला म्हणून फ्रान्सनं सीरियामध्ये आय सिसच्या तळांवर हल्ले चढवले. आयसिसचा नि:पात करू, अशी धमकीही फ्रान्सने दिली.

'चार्ली एब्दो'वर हल्ला

यावर्षी दहशतवाद्यांचं लक्ष्य होतं पॅरिस. चार्ली एब्दो या फ्रान्समधल्या प्रसिद्ध व्यंगचित्रांच्या साप्ताहिकावर यावर्षीच्या सुरुवातीलाच अतिरेक्यांनी हल्ला केला. प्रेषित मोहम्मद पैगंबरांचं व्यंगचित्र छापल्याचं कारण देऊन अतिरेक्यांनी साप्ताहिकाच्या पॅरिसमधल्या ऑफिसवर हल्ला केला. यामध्ये 12 कर्मचार्‍यांना आपले प्राण गमवावे लागले. विचार मान्य नसेल तर त्याला संपवूनच टाकायचं हे अतिरेक्याचं धोरण यामुळं जगाला पुन्हा कळून आलं. या अतिरेकी हल्ल्यानंतर या साप्तहिकाच्या कर्मचार्‍यांनी धाडस दाखवत हे साप्ताहिक सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. दहशतवादी हल्ले आमचा आवाज बंद करू शकत नाही हाच त्यांचा संदेशआहे.

इजिप्तमध्ये विमान कोसळलं की पाडलं

इजिप्तमधल्या शर्म अल शेखहून रशियाला जाणार्‍या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात 224 जणांचा मृत्यू ओढवला. या विमानाला अपघात नव्हे तर घातपात झाला असा दावा रशियाने केला आणि यानंतर इजिप्तच्या सुरक्षाव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं. या विमानाच्या लगेजमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असावा, असा सुरक्षा यंत्रणांचा अंदाज आहे. हे विमान आम्ही पाडलं, असा दावा आयसिसने केला होता. त्यामुळे या अपघातामागे अतिरेकी हल्ला असावा याबद्दलचे तर्कवितर्क सुरूच राहिले. अजूनही या अपघाताचं ठोस कारण समोर आलेलं नाही पण अतिरेकी हल्ल्याचा धोका कुठेही असू शकतो हेच यामुळे पुन्हा एकदा समोर आलं.

ग्रीसची डबघाई

ग्रीसमधल्या आथिर्क संकटाची सावली पूर्ण वर्षभर युरोपमध्ये राहिली. दिवाळखोरीत निघालेल्या ग्रीसची अर्थव्यवस्था पूर्ण डबघाईला

आली. बेरोजगारी आणि कर्जाच्या खाईत बुडालेल्या ग्रीसला बेलआऊट पॅकेज देण्यासाठी युरोपिन महासंघाने कठोर अटी घातल्या होत्या त्या ग्रीसचे अतिडाव्या विचारसरणीचे पंतप्रधान ऍलेक्सिस सिप्रास यांनी मान्य केल्या नाहीत. याच मुद्द्यावर इथे निवडणुका झाल्या. त्यामध्ये सिप्रास यांचा विजय झाला. नंतर मात्र ग्रीसने बेलआऊट पॅकेजच्या अटी मान्य केल्या. आणि त्यामुळे ग्रीसवरचं आणि पर्यायाने युरोपवरचं काही काळापुरतं टळलं.

अबु बकर अल बगदादीचा हैदोस

आयसिसचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी यालाही टाईम मासिकाने यावर्षीच्या पर्सन ऑफ द इयरमध्ये दुसरं स्थान दिलंय. कारण आयसिस या दहशतवादी संघटनेने पाश्चिमात्य जगतासोबतच जगासमोरच मोठं आव्हान निर्माण केलं आहे. बगदादीला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी अमेरिका जंगजंग पछाडतेय. यावर्षीच्या मध्यावर बगदादी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण बगदादी ठार झाल्याच्या बातमीला अजूनही दुजोरा मिळू शकला नाही. बगदादीला ठार केलं तर आयसिसचा विध्वंस आणि हैदोस कमी होऊ शकेल. त्यामुळेच बगदादीचा खात्मा पुढच्या वर्षी तरी होणार का याची सगळेजण वाट बघतायत.

 नेपाळमध्ये लोकशाही

नेपाळच्या इतिहासात 20 स्पटेंबर 2015 हा दिवस सुवर्णाक्षरानं लिहिला गेला. 240 वर्षांची राजेशाही जावून नेपाळनं अधिकृतरित्या नव्या घटननेचा स्वीकार केला आणि नेपाळ धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनलं. राज्यघटनेत हक्क डावलले गेले असा आरोप करत मधेशींनी आंदोलन पुकारलं आणि नेपाळशी सीमा बंद केली. या वादात आणि हिंसाचारात 50 जणांचा बळी गेलाय. त्यामुळे भारतातून नेपाळमध्ये होणारी मालवाहतूक बंद पडली. यावरून दोन्ही देशांमध्ये तणावही निर्माण झाला. त्यानंतर मधेशींच्या हक्कांसाठी घटनादुरूस्ती करण्याचे नेपाळ सरकारनं मान्य केलंय.

नेपाळला भूकंपाचा हादरा

एप्रिल महिन्यात आलेल्या महाविनाशकारी भूकंपामुळे नेपाळ कोलमडून पडलंय. 7.9 रिश्टर स्केलच्या या भूकंपात 10 हजारांच्या वर नागरिक मृत्यूमुखी पडले आणि प्रचंड आर्थिक नुकसान झालं. गेल्या 100 वर्षाच्या नेपाळच्या इतिहासातला हा सर्वात विनाशकारी भूकंप होता. हे नुकसान भरून यायला नेपाळला काही दशकं लागणार आहेत. आता पुनर्वसनाचं काम पूर्ण झालं असून पायभूत सुविधांच्या निर्मितींचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

सौदीत महिलांना मतदानाचा हक्क

यावर्षी सौदी अरेबियातल्या महिलांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. सौदीमध्ये रियाध, जेद्दाह, मक्का यासारख्या शहरात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये 22 महिला उमेदवार निवडूनही आल्या. सौदीसारख्या देशात अजून महिलांना

ड्रायव्हिंग करायलाही मनाई आहे. पण आता मात्र या महिला देशाचं सारथ्य करायला तयार झाल्यायत. सौदीचे राजे किंग अब्दुल्ला यांनी महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता पण त्यानंतर सौदीमध्ये निवडणुकाच झाल्या नव्हत्या. पण या निवडणुकांमध्ये मात्र महिलांना मतदानाचा हक्क बजावता आल्या. महिला अधिकारांसाठी लढणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यामुळे मोठं यश मिळालंय.

अमेरिकेत समलिंगींच्या लढ्याला यश

यावर्षी अमेरिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टाने समलिंगींच्या हक्कांना मान्यता दिली. जगभरात समंलिंगींच्या हक्कांसाठी चळवळी सुरू आहेत. भारतातही समलिंगींच्या हक्कांसाठी एलजीबीटी चळवळीचे कार्यकर्ते लढतायत. पण अमेरिकेत मात्र समलिंगींना घटनेनुसार व्यक्ती म्हणून जगण्याचा हक्क मिळालाय. हा निर्णय झाल्यानंतर अमेरिकन संसद, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अशा इमारतींवर एलजीबीटी चळवळीच्या सप्तरंगांची रोषणाई करण्यात आली होती. एलजीबीटी समुदायाने अभिमानाने अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं. आता भारतात समलिंगींना हा हक्क कधी मिळणार हा प्रश्न आहे.

 'नॅशनल डायलॉग क्वार्टेट' ला शांततेचा नोबेल

यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार चांगलाच चर्चेत आला. ट्युनिशियाच्या 'नॅशनल डायलॉग क्वार्टेट' ला हा पुरस्कार दिला गेला.पश्चिम आशियातल्या अनेक देशामध्ये 2011 साली व्यापक निदर्शनं झाली. त्यानंतर बहुताश देश युद्धाच्या नाहीतर अशांततेच्या गर्तेत सापडले. पण ट्युनिशिया तुलनेने शांत राहिला. 'नॅशनल डायलॉग क्वार्टेट'च्या सदस्यांनी ट्युनिशियामध्ये लोकशाही तत्वांवरची व्यवस्था यावी यासाठी परिणामकारक प्रयत्न केले.याबद्दल त्यांना शाततेचं नोबेल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

इंटनेट समानतेचा वाद

2015 मध्ये इंटरनेट समानतेचा मुद्दा खूपच गाजला. हा वाद चर्चेत आला तो एअरटेलच्या 'एअरटेल झीरो' तसंच फेसबुक 'फ्री बेसिक्स'मुळे. यामुळे नेट युझर्सना काही वेबसाईट्स फुकट ऍक्सेस करता येणार आहेत. मात्र या व्यतिरिक्तच्या साईट्स ऍक्सेस करायला काय सोय असणार? त्यासाठी पैसे मोजावे लाहणार का? याविषयी अधिकृतरीत्या काहीही सागितलं गेलेलं नाहीं. मुक्त इंटरनेटच्या पुरस्कर्त्यांनी अशा योजनांमुळे नेट स्वातंत्र्यावर गदा येते असं सागत अशा योजनांना विरोध केला. एअरटेल झीरो ने विरोध झाल्यावर आपली योजना मागे घेतलीय पण फेसबुक मात्र इंटरनेट समानतेसाठी आक्रमक झालंय.नवीन वर्षी हा वाद आणखीही रंगणार आहे.

गुगलचा प्रोजेक्ट लून

फेसबुकसारखी बलाढ्‌य कंपनी इंटरनेट प्रोव्हायडर क्षेत्रात उतरत असताना गूगल मागे कशी राहील? त्यांनीही प्रोजेक्ट लून लाँच केलाय. या प्रोजेक्ट द्वारे दुर्गम भागात राहणार्‍या लोकांना इंटरनेट ऍक्सेस दिला जाईल असं गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं. दुर्गम भागामध्ये इंटरनेट सर्व्हिसाठी टॉवर्स उभारणं हे फार जिकीरीचं आणि खर्चिक काम असतं. त्यामुळे या ठिकाणी इंटरनेट कंपन्या फारशा जात नाहीत. गुगल 'लून प्रोजेक्ट' या समस्येवर मात करणार असल्याचं सांगितंल जातंय. यामध्ये गुगल एक गॅसचा फुगा वातावरणाच्या वरच्या थरात सोडणार आहे. हा बलूनच इंटरनेट नेटवर्कचं वहन करेल आणि दुर्गम ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी द्यायला मदत करेल. न्यूझीलंडसारख्या काही मोजक्या देशात याच्या सध्या चाचण्या होतायत.

मंगळावर सापडलं पाणी

यावर्षी अंतराळ संशोधनातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळावर सापडलेलं पाणी. मंगळावर जीवसृष्टी असेल का किंवा होती का या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिक अनेक वर्षांपासून शोधत आहे. मंगळ ग्रहावर थोड्या प्रमाणात का होईना पण पाणी आहे. यावर या वर्षी शिक्कामोर्तब झालं. मंगळ ग्रहाच्या एका भागात तिथलं तापमान उष्ण असताना पाण्याचे ओहोळ वाहतात आणि तापमान कमी झाल्यावर ते गोठतात असं 'नासा' ने सांगितलं.यामुळे मंगळावर हजारो वर्षांपूर्वी समुद्र असावा आणि काही प्रमाणात जीवसृष्टीही असावी या तर्काला आणखी बळ मिळालंय.

पृथ्वीसारखा गृह सापडला

या वर्षी पृथ्वीशी अगदी मिळताजुळता असाही एक ग्रह शास्त्रज्ञांना सापडला. या ग्रहाचं नाव आहे केप्लर. पृथ्वीपासून 1400 प्रकाशवर्ष दूर असणारा हा ग्रह पृथ्वीच्या दीडपट आकाराचा आहे. आपल्या सूर्यासारख्याच एका तार्‍याभोवती तो परिभ्रमण करतोय. केप्लरचं त्याच्या सूर्यापासूनचं अंतर पाहता केप्लरवर द्रव रूपात पाणी असल्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या ग्रहावर जीवसृष्टी सापडली तर ती एक महत्त्वाची आणि मोठी बातमी ठरेल. पण केप्लर पृथ्वीपासून 1400 प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरावर असल्याने सध्या तरी आपल्याला दुरूनच केप्लर चा वेध घेत अंदाज बांधावे लागणार आहेत.

मोबाईल मार्केटमध्ये चढउतार सुरूच

हे वर्ष टेक्नॉलॉजी लव्हर्ससाठीही चांगलं ठरलं. खिसा गरम असणार्‍यांसाठी आणि बजेट स्मार्टफोन विकत घेणार्‍या सर्वांसाठी बाजारात भरपूर ऑप्शन्स होते. या वर्षीचा सगळ्यात इंटरेस्टिंग फोन होता सॅमसंग एज. सेलफोन यूझर्सना पहिल्यांदाच कर्व्हड ग्लास म्हणजे चक्क वाकलेली स्क्रीन असलेला फोन वापरायला मिळाला. गुगलनेही त्यांच्या यशस्वी 'नेक्सस' सीरीजमध्ये नेक्सस 5ंX आणि नेक्सस 6P हे नवे फोन्स लाँच केले. 'ऍपल'भक्तांनाही आयफोन 6S आणि आयफोन 6S प्लसच्या रूपात नवा 'स्टेटस सिंबॉल' मिळाला. पण 'वन प्लस' या चायनीज कंपनीने मार्केट हलवून टाकलं. त्यांचे 'वन प्लस वन', 'वन प्लस एक्स' ाणि 'वन प्लस टू' या स्मार्टफोन्सना चांगला प्रतिसाद मिळाला. कमी किमतीत चांगली स्पेसिफिकेशन्स ही या फोन्सची जमेची बाजू ठरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: December 31, 2015, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading