S M L

'अजेंडा महाराष्ट्र'मध्ये उमटला महाराष्ट्राचा विकास आराखडा !

Sachin Salve | Updated On: Oct 30, 2015 09:51 PM IST

'अजेंडा महाराष्ट्र'मध्ये उमटला महाराष्ट्राचा विकास आराखडा !

30 ऑक्टोबर : महाराष्ट्राचा विकास आराखडा कसा असावा ?, याचा वेध घेण्यासाठी आयबीएन लोकमतचा 'अजेंडा महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आज मोठ्या दिमाखात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं धोरण सविस्तरपणे विशद केलं. मुख्यमंत्र्यांच्या सेशननंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दुपारचं सत्र गाजवलं. त्यांनी नेहमीप्रमाणेच ठाकरे शैलीत फटकेबाजी करत शहरांच्या नियोजनाचा आराखडा महाराष्ट्रासमोर मांडला. तर संध्याकाळच्या सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फक्त महाराष्ट्रासोबतच केंद्र सरकारचं यापुढचं धेयंधोरण नेमकं कसं असेल याची सविस्तर मांडणी केली.

साहित्यिकांनी खैरलांजीच्या वेळी पुरस्कार का परत केले नाही ? - मुख्यमंत्रीदेशात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या विरोधात साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्याचे हत्यार उपसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले. साहित्यिकांनी कुण्या एकाची बाजू घेणं सुरू केलंय. अशामुळे समाजाला कुणीच वाचवू शकत नाही, अशी थेट प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच साहित्यिक, कलावंतांबद्दल आदरच आहे. पण खैरलांजी घडलं तेव्हा पुरस्कार परत केले नाहीत.मोदींच्या राज्यातच हे जाणीवपूर्वक केलं जात आहे, अशी टीकाही त्यांनी केलीये.

शेतकर्‍यांवर अस्मानी संकट गंभीर आहे अशी कबुली देत शेतकर्‍यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभं राहिलं. गेल्या नऊ महिन्यात 6 हजार गावांमध्ये पाण्याचं नियोजन केलं आहे. शेतकर्‍यांना वर्षभरात 1 लाख 20 हजार वीज कनेक्शन दिले आहेत. शेतकर्‍यांना कर्जपुरवठाही केला जाईल. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 8 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे वाटण्यात आले आहे. 67 लाख शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला असून 54 लाख हेक्टर शेतीचा वीमा काढला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 15 वर्षांनंतर सुरुवात केली आहे काही अडचणी, अडथळे आहे ते पार करून काम करावं लागणार आहे. 5 वर्षांत महाराष्ट्राला नवी दिशा देणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं गुलाम अली आणि खुर्शीद कसुरी यांच्या कार्यक्रमाला विरोध करत राडा घातला. मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य करत शिवसेनेला चांगलंच फटाकारलं. निखळ कलावंतांना देशाची सीमा नसते. आपलेही कलाकार इतर देशात जात असतात. आपल्या देशात बाहेरुन आलेल्या कलाकारांना संरक्षण देणं हे आपलं काम आहे. भावना आणि सन्मान दोन्ही गोष्टींचा समतोल राखला गेला पाहिजे असं स्पष्ट मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

Loading...

====================================================================

आधी टीका आणि नंतर सल्ले, राज ठाकरेंची मोदींवर टीका

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजेंडा महाराष्ट्र कार्यक्रमाचं दुसर सत्र आपल्या रोखठोक स्टाईलने गाजवलं. परप्रांतीय, राष्ट्रवादी, नरेंद्र मोदी यांच्यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. निवडणुकीच्या पूर्वी शरद पवारांना हद्दपार करणार, राष्ट्रवादी भ्रष्टवादी पार्टी आहे अशी टीका करणारे पंतप्रधान मोदी बारामतीत जाऊन त्यांचे सल्ले घेतात. जेटली तर देशात 100 बारामती उभाराव्यात अशी स्तुतीसुमनं उधाळली. याला नेमकं काय म्हणायचं ?, निवडणुकीआधी टीका आणि निवडणुकीनंतर मांडीला मांडी लावून बसायचं हा सगळा धोतांडपणा आहे अशी टीका राज यांनी भाजपवर केली.

राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांवर आसूड ओढला. परप्रांतीयांमुळे महाराष्ट्र बकाळ झालाय. ज्यावेळी लातूरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा कुणी मदत केली होती ?, मदतीला ही लोकं धावून आली नाही. पण, जेव्हा गुजरातमध्ये भूकंप झाला तेव्हा मुंबईतील गुजरात्यांनी भरभरून पैसा पाठवला मग लातूर का मदत केली नाही ?, इथं राहायचं, मोठं व्हायचं पण मदतीसाठी माघार घ्यायची हे नियमात बसणारं नाही. दुष्काळपरिस्थिती निर्माण झाली तरीही कुणी पुढाकार घेतला नाही. जर महाराष्ट्रात राहायचं असेल पुढाकार घेतलाच पाहिजे असं परखड मत राज यांनी व्यक्त केलं.

तसंच शहरं स्वच्छ ठेवणं गरजेचं, पण असं आज होत नाही. बाहेरून आलेले लोंढे शहरांची पुरती वाट लावून ठेवलीये. बाहेरुन आलेली माणसं जेव्हा मतदारसंघ निर्माण करता तेव्हा भीती निर्माण होते.अबू आझमी सारखा माणूस दोन दोन मतदारसंघातून निवडून येतो हे त्यांचं उदाहरण असून भविष्यात ही धोक्याची घंटा आहे. आज बाहेरून आलेले लोंढे आपल्या नोकर्‍या हिसकावून घेत आहे. पण मुळात आपलं कुंपनच शेत खातं हा मोठा प्रश्न आहे. रेल्वेभरतीच्या वेळी बाहेरून आलेले लोंढे जागा मिळवता. आम्ही जेव्हा याची माहिती मराठी मुलांना पोहचवली तेव्हा 5 लाख मुलांची रेल्वेभरतीचा अर्ज भरले. पण, ही माहिती त्यांच्याजवळ पोहचत नसले तर मराठी मुलांना नोकर्‍या कशा मिळणार ? असा परखड सवाल राज यांनी उपस्थित केला.

टोलचा पोलखोल करणारच - राज ठाकरे

टोलचा मुद्या जर आम्ही मांडला नसता महाराष्ट्राच्या पटलावर आला नसता असं स्पष्ट करत आमच्या टोल आंदोलनामुळे राज्य सरकारला टोल बंद करावे लागले. टोल आंदोलन सुरू होतं तेव्हा इतर पक्ष रस्त्यावर उतरले नाही. जर टोलचा विषय काढला नसता तर कुणालाच हा विषय कळालाही नसता. टोलविरोधात आंदोलन सुरूच राहिल आणि आणखी टोलची पोलखोल करणार असं राज यांनी यावेळी जाहीर केलं.

..मी रस्त्यावरच्या पॉवरमध्ये आहे -राज ठाकरे

स्वच्छ आणि चांगला महाराष्ट्राचं स्वप्न पाहणार मी माणूस आहे. जे शक्य होणार नाही ती स्वप्न मी कधीच दाखवणार नाही.

मी राज्याच्या सत्तेत पॉवरमध्ये नाही पण रस्त्यावरच्या पॉवरमध्ये आहे असं राज ठणकावून सांगितलं. इथल्या माणसाला मान सन्मान मिळाला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. पण आम्ही एका बाजूला काम करतोय आणि दुसरे सुपार्‍या घेऊन काम करत आहे अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली.

पाकनेही नीट वागावं - राज ठाकरे

माझा पाकिस्तानी कलाकारांना विरोध नाही. मुळात हा विषय कलाकारांचा नाही तर देशात्या वृत्तीचा आहे. कलाकारांना बंदी घालण्यापेक्षा वृत्तीत बदल केला पाहिजे. जर देवाणघेवाण करायचीच असेल तर पाकनेही तसंच वागलं पाहिजे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

फेसबुकपेक्षा फेसव्हॅल्यू जपली पाहिजे -राज ठाकरे

आपण ट्विटरवर कधी येणार ?, असा सवाल विचारला असता राज यांनी आपल्या स्टाईलने हा प्रश्न टोलावून लावला. रोज कोण-कोण ट्विट करत बसणार आहे. आपलं बरं आहे एकदाच बोलायचं. त्यामुळे ट्विटवर वगैरे काही जमणार नाही. खरंतरं फेसबुकपेक्षा फेसव्हॅल्यू जपली गेली पाहिजे असा खुमासदार टोला लगावत राज यांनी ट्विटर फेसबुक नको रे बाबा असा पवित्रा घेतला.

====================================================================

मुंबईची वाढ होण्याला आता मर्यादा -गडकरी

अजेंडा महाराष्ट्राची सांगता झाली ती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या चर्चा सत्राने. नितीन गडकरींनी राज्याच्या पायाभूत सुविधांवर प्रकाशझोत टाकला. येणार्‍या काळात काय-काय करता येईल याचा लेखाजोखा गडकरींनी मांडला. महाराष्ट्र आणि मुंबई माझं घरं, केंद्रात फक्त मी राज्याचा दूत आहे असं सांगत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. याअगोदरही मी मंत्री असतांना कामाचा धडाका तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल. आताही त्याच उमेद्दीने काम करतोय. मुंबई ते गोवा सिमेंट क्रॉक्रिटकरण करून चार पदरी रोडचं काम सुरू आहे. महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 4 एक्स्प्रेस वे चं काम सुरू आहे अशी माहिती यावेळी गडकरींनी दिली. एवढंच नाहीतर ज्या मार्गाने वारी प्रस्थान होत असते त्या मार्गांमध्ये वारकर्‍यांना विश्राम करता यावा यासाठी विश्रांतीगृह उभारणाराचा प्रयत्न सुरू आहे असंही गडकरींनी सांगितलं.

यावेळी गडकरींनी मुंबईबद्दल स्पष्ट आणि परखड मत मांडलं. मुंबई माझं घरं आहे. पण आता या घराला मर्यादा आली आहे. बाहेरून आलेल्या लोंढ्यांमुळे मुंबईत आता जागाच उरली नाही. त्यामुळे इथं नवे कारखाने काढण्यात अर्थ नाही असं स्पष्ट मत गडकरींनी व्यक्त केलं. पण, मुंबईसाठी खूप काही करायचंय. मुंबईला लाभलेला अथांग समुद्राचं पाणी स्वच्छ करायचं. परदेशातील समुद्रात आपला चेहराही दिसतो. तसाच अरबी समुद्रात आपला चेहरा दिसेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे अशी माहितीही गडकरींनी दिली. तसंच दुबईतील बूर्ज खलीफा सारखी भव्य अशी उंच वास्तू आहे. तशीच वास्तू राजा छत्रपती टॉवर नावाने महाराष्ट्रात उभारायची आहे. या इमारतीत 100हून जास्त मजले असतील. सर्वात वरच्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांची गॅलरी असेल असं स्वप्नंही गडकरींनी बोलून दाखवलं. टोलचा झोल मीच सुरू केला बंदही मीच करणारा या आपल्या वादग्रस्त विधानाचं स्पष्टीकरणही गडकरींनी दिलं. हे विधान फक्त राजकीय स्टंट होतं. मी स्वत: 67 टोल बंद केले आणि लवकरच आणखी 17 टोल बंद करणार अशी घोषणाही गडकरींनी केली.

साहित्यिकांनी मोदी सरकारला टार्गेट करू नये- गडकरी

साहित्यिकांनी पुरस्कार परत करतायत त्यांची मानसिकता आमच्या लक्षात आलीये. मुळात डॉ. कलबुर्गी आणि दादरी प्रकरणाचा केंद्राशी संबंध नाही. हा राज्य सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यांना पुरस्कार परत करायचे असेल तर राज्य सरकारकडे जाऊन करावे. पण, जेव्हा मुंबईत बॉम्बस्फोट झाले, खैरलांजी प्रकरण घडलं, दाभोलकर, पानसरेंची हत्या झाली तेव्हा साहित्यिकांनी पुरस्कार का परत केले नाही असा सवाल उपस्थित करत साहित्यिकांनी मोदींना जबाबदार धरू नये असं ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2015 09:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close