चांगला संसार मोडणार नाही, पण...-उद्धव ठाकरे

चांगला संसार मोडणार नाही, पण...-उद्धव ठाकरे

  • Share this:

uddhav_thackery_dasara_melava_201522 ऑक्टोबर : आम्हाला सत्तेत कधीपर्यंत राहायचं आणि कधीपर्यंत राहायचं नाही हे आम्हाला माहित आहे. सरकारमधून आम्ही बाहेर कधी पडणार याची इतरांनाच जास्त घाई लागली आहे. पण, चांगला संसार मोडणार नाही, आमची बांधिलकी जनतेशी आहे, सत्तेशी नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेतून बाहेर पडणार नाही असं स्पष्ट केलं. तसंच 'मंदिर वही बनाएंगे, लेकीन तारीख नही बताएंगे' असा टोलाही उद्धव ठाकरेंचा भाजपला लगावला. ज्या शरद पवारांनी सत्तेसाठी लाचारी केली त्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये असा खणखणीत पलटवारही उद्धव यांनी केला. शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा आवाज शिवसेनेचा घुमला. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातल्या दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौफेर तोफ डागली. उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजप, दादरी प्रकरण, फरिदाबाद दलित हत्याकांड, शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली.

'मंदिर वही बनायेंगे पण तारीख नही बतायेंगे'

उद्धव यांनी भाषणाच्या सुरुवातीलच भाजपवर निशाणा साधला. भाजप सत्तेवर विराजमान झाली आणि पुन्हा एकदा मंदिर वही बनायेंगे अशा घोषण देणं सुरू झालंय. पण, ही लोकं मंदिर वही बनायेंगे पण तारीख नही बतायेंगे असंही करत आहे असं सांगत उद्धव यांनी भाजपला टोला लगावला.

'सेनेच्या तोफेसमोर शत्रू आणि मित्रही लक्ष'

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. पण, शिवसेनेच्या तोफेसमोर कोण असणार कोण नाही नाही हे आम्ही ठरवतो. आमच्या तोफेसमोर पाकिस्तान आहे आणि तो राहणारच. आम्ही भाजपवर काय बोलायचं. भाजप तोफेसमोर नाही. मात्र, जर कुणी देशाविरोधात वागत असेल, जनतेला कुणी फसवत असेल तर ते सगळे तोफेसमोर आहे. मग तो आमचा मित्रपक्ष का असेना. आम्ही जसे होते तसेच आताही आहोत. हातातून भगवा कधीच बदलणार नाही असं उद्धव यांनी ठणकावून सांगितलं.

 

'बाप हे बापटांना पटायला पाहिजे'

उद्धव यांच्यापूर्वी संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना लहान भाऊ...मोठा भाऊ..मानत नाही. बाप हा बाप असतो असं प्रत्युत्तर राऊत यांनी गिरीश बापट यांना दिलं. राऊत यांच्या भाषणाचा दाखला देत उद्धव यांनी बापटांवर शरसंधान सांधलं. शिवसेना ही बापच आहे. पण त्या बापटांना बाप पटला पाहिजे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.

'शरद पवारांनी स्वाभिमान शिकवू नये'

uddhav_on_sharad_pawarशिवसेना आता बाळासाहेबांनी सेना राहिली नाही. सेनेच्या नेत्यांमध्ये स्वाभिमान उरला नाही अशी टीका करणार्‍या शरद पवारांचा समाचार घेण्यास आता कंटाळा आलाय. नेहमी तेच तेच बोलायचं. ज्या बाळासाहेबांच्या आठवणींचा दुजोरा देतायत. तेव्हा बाळासाहेब तुम्हाला काय म्हण्याचे ?, ते मी पण म्हणू का ?, आता अशी टीकाही करू शकतो पण, मी सभ्यता बाळगून आहे. मुळात ज्या शरद पवारांनी सत्तेसाठी सोनियांसमोर लाचारी केली त्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये असा सणसणीत टोला उद्धव ठाकरेंनी पवारांना लगावला.

'हिंदुत्वाच लेबल लावू नका'

समीर गायकवाडला ताब्यात घेतलं तर लगेल सनातनवर बंदीची मागणी होऊ लागली आहे. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाली. त्यांच्या मारेकर्‍यांना भर चौकात फाशी द्या. मात्र, मारेकर्‍यांना हिंदुत्वाच लेबल लावू नका. याआधीही प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहीत यालाय कित्येक वर्षे जेलमध्ये सडवत आहात. त्यांच्यावर आरोपही ठेवले नाहीत. एकीकडे त्या याकूब मेमनसाठी मध्यरात्री कोर्टाचे दार उघडले जाते. मग हा उफराटा न्याय नाही का ? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थिती केला.

'सुधींद्र कुलकर्णी लाल माकड'

uddhav on kulkarni_444शिवसैनिक कोणत्या मार्गाने उत्तर देऊ शकते याचे उदाहरण ते लाल माकड (सुधींद्र कुलकर्णी) आहे. शिवसैनिकांनी शस्त्र म्हणून आईल पेंट वापरलं आणि साधं सुधं नाहीतर पैसे वसूल पेंट होतं. सीमेवर जवान शहीद होतायत आणि हे त्यांच्या नेत्यांना इथं पायघड्या घालत आहे. बरं वाद काय होता पुस्तक प्रकाशनाचा..कुलकर्णी माझ्याकडे आले होते. त्यांनी कसुरींचं पुस्तकही दाखवलं. या पुस्तकामध्ये पाकविरोधातही लिहिलं असं त्यांनी सांगितलं बरं लिहिलंही असेल पण त्याचं प्रकाशन इथं कशाला ?, अखेर शिवसैनिकांनी शाईचं उत्तर शाईने दिलं. या लाल माकडाचं तोंड काळ केलं असं सांगत उद्धव यांनी शिवसैनिकांची जोरदार पाठ थोपाटली.

'सावरकरांना भारतरत्न दिला पाहिजे'

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न दिला पाहिजे अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे मांडली. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी गल्ली ते दिल्ली गाजवून सोडू पण सावरकरांना भारतरत्न दिलाच पाहिजे. जेलमध्ये राहुनही सावरकरांनी प्रेरणादायी कार्य केलंय. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने भारतरत्न घोषित करावा अशी मागणी ही त्यांनी केली.

'दादरी प्रकरणामुळे देशाची मान खाली'

आम्ही शाईहल्ला केला म्हणून मान खाली गेली असं जर कुणी म्हणत असले तर घरात कुणी गोमांस ठेवलं या संशयावर निष्पापाचा बळी घेतला जातोय अशा दादरी प्रकरणामुळे देशाची मान खाली गेलीये. काय दोष होता तरी त्या अखलाकचा ?, एकीकडे अशा घटना घडताय मग भाजपचे एक नेते आपण गोमांस खातो असं कबुल करताय मग त्यांना पाकिस्तानात नेऊ सोडणार का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

मग इंदू मिलच भूमिपूजन का केलं ?uddhav on indu mill

हरियाणामध्ये घडलेल्या दलित हत्याकांड प्रकरणावर व्ही.के.सिंग यांनी दलितांची कुत्र्याशी बरोबरी केली, मग इंदू मिलच भूमिपूजन का केलं ? असा परखड सवालही उद्धव यांनी उपस्थित केला. या देशाला हिंदूराष्ट्र घोषित करून टाका आणि देशात सर्वांना समान नागरी कायदा लागू करा आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मग होऊ द्या काय होईल ते असंही उद्धव म्हणाले. भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवून दाखवणारच असा विश्वासही व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 23, 2015, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading