'डाल में कुछ काला हैं', साठेबाजांकडून कोट्यवधींची डाळ जप्त

'डाल में कुछ काला हैं', साठेबाजांकडून कोट्यवधींची डाळ जप्त

  • Share this:

21 ऑक्टोबर : 'डाल में कुछ काला है' असा डायलॉग हिंदी सिनेमातून आपण नेहमी ऐकतो किंवा कुणावर संशय आला तर साहजिकच आपण असं म्हणतो. पण, महाराष्ट्रात तूरडाळीच्या दरात अचानक झालेली वाढ पाहता असंच काही म्हणण्याची वेळ आलीये. तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्यानंतर राज्य सरकारने धाडसत्र सुरू केलं आणि साठेबाजाकडून थोडीथोडकी नाहीतर कोट्यवधी किंमतीची डाळ जप्त करण्यात आलीये. साठेबाजांनी हजारो टन डाळ दडवून ठेवली याचा पर्दाफाशच झालाय.

tur dal_price hikeडाळींच्या साठेबाजींवर नियंत्रण लावण्यासाठी संपूर्ण राज्यभर छापेमारी सुरू आहे. आतापर्यंत 23 हजार मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत तब्बल 190 कोटी इतकी आहे. एकट्या नागपुरात साडे सात कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाई मुळे साठेबांजांचे धाबे दणाणले असून तूर डाळीची किंमत क्विंटली 15 हजारावरून 12 हजार एवढी उतरली आहे.

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धाडी 29 गोडावून्ससह 55 ठिकाणी टाकण्यात आल्या. अद्यापही या धाडीचे सत्र सुरुच आहे. व्यापार्‍यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या गोडावून्स मधील साठवणुकीच्या मर्यादेपेक्षा जास्त साठा आढळून आला आहे. नागपूरच्या कामठी तालुक्यातील महालगाव येथील गाला वेअर हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड, शाह फूज प्रॉडक्ट्स, मा ऊमिया फुड पार्कमध्ये ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तुर डाळ, चणा डाळ, लाखोळीची डाळ, तेलबिया जप्त करण्यात आल्या आहेत.

शहापुर तालुक्यात आसनगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या बाफना कमोडिटी मील आणि ताज एग्रो इंडस्ट्री या दोन डाळी तयार करणार्‍या कारखान्यांवर पुरवठा विभागाने छापा टाकला. या कारवाईत 1 लाख 86 हजार किलो मसूर डाळ सील केली. याची किंमत बाजारात 1 लाख 12 हजार इतकी आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरात कारवाई

कोल्हापूरमध्ये जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी तेल आणि डाळीचे साठे करणार्‍यांवर छापे टाकले. सणाच्या तोंडावर साठा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात अनेक अवैध तेलसाठे जप्त करण्यात आले. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात ही धडक कारवाई करण्यात आली. या व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. अधिकारी व्यापार्‍यांचा परवानाही रद्द करण्याची शक्यता आहे.

तूरडाळ आयात

तूरडाळीचे भाव वाढल्यानं मोठ्या प्रमाणावर डाळ आयात करण्याचा निर्णय झालाय. येत्या दोन महिन्यांमध्ये तब्बल सात लाख टन तूर डाळ आयत होणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ही डाळ यायला सुरवात झाली असून आत्तापर्यंत 75 हजार टन डाळ मुंबईत दाखल झालीय. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातून ही डाळ मुंबईत येतेय. डाळीची मोठ्या प्रमाणावर आयात सुरू झाल्यानं येत्या काही दिवसांमध्ये डाळीच्या भावात घसरण सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, डाळीच्या साठेबाजांविरूद्ध राज्यभर धडक मोहिम राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत जवळपास दोनशे कोटी रूपयांची 23 हजार टन डाळ जप्त करण्यात आलीय. तर मुंबईतल्या 4 व्यापार्‍यांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शेतकारी उपाशी, व्यापारी तुपाशी

तूरडाळ दरवाढीचा फायदा केवळ व्यापार्‍यांना होत असल्याची तक्रार शेतकर्‍यांची आहे. तूर शेतकर्‍यांकडे होती तेव्हा भाव केवळ 4 ते 5 हजार प्रति क्विंटल होते. मात्र व्यापार्‍यांनी खरेदी केल्यानंतर आज भाव प्रति क्विंटल 13 ते 14 हजार रुपये झाले आहेत. तूर डाळ पिकवणार्‍या शेतकर्‍यांनाच ती खरेदी करता येत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार आणि व्यापार्‍यांची मिलीभगत असल्याने ही भाववाढ झाल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अमरावती इथल्या शेतकर्‍यांनी दिल्यात.

अबब! केवढा हा साठा

 

महाराष्ट्र - 23340 टन

छत्तीसगड - 4525 टन

तेलंगणा - 2546 टन

मध्य प्रदेश - 2295 टन

हरयाणा - 1168 टन

आंध्र प्रदेश - 860 टन

कर्नाटक - 480 टन

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 21, 2015, 9:26 PM IST

ताज्या बातम्या