19 ऑक्टोबर : 'कुणी घर देता का घर' हे नटसम्राट या नाटकातील अजरामर संवाद आता सिनेसृष्टीचे नटसम्राट नाना पाटेकर यांच्या तोंडी ऐकायला मिळतील. कारण वि.वा. शिरवाडकर यांचं सुप्रसिद्ध नाटक 'नटसम्राट ' आता मोठ्या पडद्यावर येतंय. या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय.
दिग्दर्शक महेश मांजरेकर याचं दिग्दर्शन करत आहेत. डॉ.प्रकाश बाबा आमटे यांच्यावर आधारित सिनेमानंतर आता नाना पाटेकर अप्पासाहेब बेलवलकर या रंगभूमीवर अत्यंत गाजलेल्या व्यक्तिरेखेत दिसतील. या सिनेमात त्यांना साथ देणार आहेत रिमा लागू आणि विक्रम गोखले. नटसम्राटचं पहिलंवहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंय. 'असा नट होणे नाही' अशी या कथेला शोभणारी टॅगलाईन घेऊन या सिनेमाचं पोस्टर भेटीला आलंय. चित्रपटाचं शुटिंग सुरु होण्यापूर्वीच याची चर्चा सुरू होती कारण कुठल्याही नटाला आव्हानात्मक वाटेल अशी ही भूमिका नाना पाटेकर साकारणार आहेत.नटसम्राट हे वि.वा.शिरवाडकरांनी मराठी रंगभूमीला दिलेले अजरामर रत्न आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे याची उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv |