... ही तर संपूर्ण देशवासियांची भावना - संजय राऊत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2015 01:54 PM IST

sanjay raut

19 ऑक्टोबर : भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट मालिकेला विरोध दर्शवण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात घातलेल्या गोंधळाचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. या शिवसैनिकांच्या नव्हे तर संपूर्ण देशवासियांच्या भावना असल्याचं सांगत संजय राऊत यांनी आम्हाला शिवसैनिकांचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये डिसेंबरमध्ये होणार्‍या क्रिकेट मालिकेसंदर्भातील चर्चेसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र या बैठकीला शिवसेनेने विरोध दर्शवला असून मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना कार्यकर्त्यांनी या मालिकेला विरोध दर्शवला आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांच्या या विरोधाचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र समर्थन केलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेतली आणि चर्चेला विरोध दर्शवला असेही त्यांनी सांगितलं. तसंच जोपर्यंत पाकिस्तान सीमेवरचा दहशतवाद सुरू ठेवतंय तोपर्यंत पाकिस्तानशी कोणत्याही पद्धतीचे संबंध ठेवू नयेत, अशी लोकभावना आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी काही मोठा गुन्हा केलेला नसून शिवसेनेला शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनाचा अभिमान असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांनी मात्र अप्रत्यक्षपणे शिवसेनेला पाठिंबा दिला. भारत-पाक मालिकेला शिवसेनेने नेहमीच विरोध दर्शवला आहे, त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे, भारत-पाक मालिका नाही झाली तर आभाळ कोसळणार नाही, अशी प्रतिक्रिया भांडारी यांनी दिली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2015 01:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...