सेनेचा विरोध झुगारून अखेर कसुरींचं पुस्तक प्रकाशित !

सेनेचा विरोध झुगारून अखेर कसुरींचं पुस्तक प्रकाशित !

  • Share this:

kasuri book vs sena12 ऑक्टोबर : कार्यक्रम उधळून देण्याची धमकी, सुधींद्र कुलकणीर्ंवर पेंट हल्ला आणि कार्यक्रमावर बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...शिवसेनेच्या या प्रखर विरोधानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री के. एम. कसुरी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत सुरळीत पार पडला. सुधींद्र कुलकर्णी यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. पुस्तक प्रकाशनामुळे आज दिवसभरात उठलेलं 'शिव'शाई वादळ संध्याकाळी अखेर शांत झालं.

पाकिस्तान विरोधात आम्ही 25 वर्षांपासून मैदानात आहोत अशी कठोर भूमिका घेत शिवसेनेनं अगोदर गझलनवाज गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. सेनेच्या विरोधामुळे हा कार्यक्रम अखेरीस रद्द झाला. पण त्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री के. एम. कसुरी यांचं 'नायदर अ हॉक नोर अ डोव्ह' या पुस्तकाचं प्रकाशन ओआरएफ संस्थेचे संस्थापक सुधींद्र कुलकणीर्ंनी आयोजित केलं. शिवसेनेनं या सोहळ्यालाही विरोध दर्शवला होता. सुधींद्र कुलकणीर्ंनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विरोध न करण्याची विनंती केली. पण, याचा काही फायदा होऊ शकला नाही. आज सकाळी शिवसैनिकांनी कुलकणीर्ंना भररस्त्यावर ऑईल पेंट फासलं. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. सुधींद्र कुलकर्णी आणि कसुरी यांनी तातडीने पत्रकार परिषद सेनेच्या भूमिकेविरोधात कडाडून विरोध नोंदवला. आणि पुस्तक प्रकाशन सोहळा होणारच असं ठामपणे नमूद केलं. शिवसेनेनंही आक्रमक होतं सुधीर कुलकर्णी हे पाकचे एजंट आहे अशी विखारी टीका केली. संजय राऊत यांनी कसुरी यांना भारतद्वेषी असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी राऊत यांनी पत्रकाद्वारे केली.

पण, या विरोधानंतर अखेर संध्याकाळी नेहरु सेंटरवर कडेकोट बंदोबस्तात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मुंबई सर्वसमावेशक शहर असून हे लोकशाहीवादी शहर आहे. आपल्या सहनशक्तीची परीक्षा आज पाहिली गेली. पण मुंबई महाराष्ट्रीय आहे. पण, त्याही आधी मुंबई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आहे. भुतकाळात झालेल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे आणि हाच आमचा प्रयत्न आहे असं मत यावेळी सुधींद्र कुलकर्णी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला कुमार केतकर, दिलीप पाडगावकर, प्रकाश आंबेडकर, अभिनेते नसीरुद्दीन शहा उपस्थित होते. पण ना मुख्यमंत्र्यांनी, ना आयोजकांनी सेनेच्या मागणीकडे लक्ष दिलं, आणि कार्यक्रम अखेरीस सुरळीत पार पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: October 12, 2015, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading