कधी होणार दप्तराचं वजन कमी?, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

कधी होणार दप्तराचं वजन कमी?, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

  • Share this:

vinod tawde with bags

24 सप्टेंबर : विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याचे अध्यादेश काढूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. चार आठवड्यांत राज्यातील सर्व शाळांमध्ये दप्तरांचे वजन कमी करण्याचे स्पष्ट निर्देश शाळांना पत्रकाद्वारे कळवा, असा आदेश न्यायालयाने दिलाय. यासाठी ई-मेलचा वापर करण्याचेही न्यायालयाने सुनावलय.

चेंबूरमधील पालक स्वाती पाटील यांनी केलेल्या जनहित याचिकेवर आज न्या. विद्यासागर कानडे व न्या. शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सरकारने दप्तरांचे ओझे कमी करण्याच्या निर्णयाची शाळांमध्ये अंमलबजावणी करण्याची कार्यवाही करावी आणि शाळा यासाठी कोणत्या उपाययोजना करताहेत, याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये एका अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले. शाळांनी विद्यार्थ्यांसाठी पर्यायी लॉकरची सुविधा पुरवावी, शाळेचे वेळापत्रक बदलून सर्व विषय एकाच दिवशी येणार नाही असे पाहावे, अशा काही सूचनाही खंडपीठाने सरकारला केल्या. दप्तराच्या सध्याच्या वजनापेक्षा किमान अर्ध्यापट वजन शाळेने कमी करण्याची गरज आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. यावर राज्यभरात सुमारे एक लाख 65 हजार 495 शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये परिपत्रक पाठविण्यास आणि माहिती देण्यास अधिक वेळ लागेल, असे सरकारी वकीलांनी सांगितले. मात्र अनेक शाळांच्या स्वतःच्या वेबसाईटस आणि ई-मेल आयडी असतात. त्यावरही राज्य सरकार परिपत्रक आणि माहिती देऊ शकते, अशी सूचना न्यायालयाने केली.

सध्याच्या परिस्थितीत शाळेतील विद्यार्थी त्याच्या वयापेक्षा तब्बल वीस ते तीस टक्के अधिक वजनदार दप्तर पाठीवर घेतो. यामुळे साठ टक्केहून अधिक मुलांना पाठीचे विकार होत आहेत, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. त्यामुळे नक्की किती वजन कमी करायचे याचीही स्पष्ट माहिती शाळा व्यवस्थापनांना सरकारने द्यायला हवी, असे न्यायालयाने सांगितले. राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालात विविध शिफारशी सुचविल्या आहेत.

न्यायालयाच्या सूचना

- परिपत्रक सोप्या भाषेत सुस्पष्ट द्या.

- तपास अधिकार्‍याची नियुक्ती हवी.

- विद्यार्थ्यांना लॉकर द्या.

- सर्व विषय एकाच दिवशी नको.

- वजन हलके करणारे वेळापत्रक हवे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2015 09:46 AM IST

ताज्या बातम्या