मुंबई 11/7 साखळी बॉम्बस्फोट : 12 दोषी तर एक निर्दोष

मुंबई 11/7 साखळी बॉम्बस्फोट : 12 दोषी तर एक निर्दोष

 • Share this:

mumbai-tain blast_0_0

10 सप्टेंबर : 11/7 लोकल साखळी बॉम्बस्फोटातील 13 पैकी 12 आरोपींना कलम 302 अंतर्गत यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. मुंबईत 11 जुलै 2006 रोजी मुंबईतल्या पश्चिम रेल्वेमध्ये साखळी बाँबस्फोट घडवण्यात आला होता. याप्रकरणी विशेष मोक्का कोर्टाने आज आपला निर्णय दिला. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर या स्फोटातील पीडितांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

11 जुलै 2006 रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलमध्ये संध्याकाळी गर्दीच्या वेळी 11 मिनिटांत वेगवेगळ्या ठिकाणी सलग सात साखळी बॉम्बस्फोटा झाले होते. यात मीरा रोड, भाईंदर, बोरिवली, जोगेश्वरी, खार रोड, वांद्रे, माहिम आणि माटुंगा रोड या रेल्वे स्टेशन्सचा समावेश होता. तसंच बोरिवलीमध्ये एक जिवंत बाँब नष्ट करण्यात आला होता. या साखळी बाँबस्फोटांत तब्बल 189 निष्पापांचा जीव गेला होता. तसंच 800हून अधिक जणं जखमी झाले होते.

लष्कर-ए-तोयबानं या साखळी बॉम्बस्फोटाचा कट रचला होता. या बॉम्बस्फोटात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचाही हात असल्याचा संशय होता. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पोलीस पथकानं (एटीएस) याप्रकरणी 13 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.त्यामध्ये कमाल अहमद अन्सारी, डॉ. तन्वीर अन्सारी, मोहम्मद शेख, सिद्दीकी, मोहम्मद शफी, शेख आलम शेख, मोहम्मद अन्सारी, अब्दुल शेख, मुझमिल शेख, सोहील शेख, जमीर शेख, नावेद खान आणि असिफ खान यांचा समावेश आहे. त्यांच्यावरील आरोप सिध्द करण्यासाठी 192 साक्षीदारांची साक्ष तपासून त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत महत्वाचा असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. तर न्यायालयाच्या या निकालाने पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाला असून माझ्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद महत्वाचा असल्याचं सरकारी वकील राजा ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच जनतेला न्याय मिळाला असून सोमवारच्या युक्तीवादानंतर दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

आजच्या कोर्टाच्या निकालासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहे. नवे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची ही पहिली मोठी परीक्षा मानली जातं आहे. मुंबई पोलिसांचे सर्व 55 हजार अधिकारी आणि कार्मचारी आज बंदोबस्तावर असतील. सर्वांच्या सुट्‌ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या बरोबरच एसआरपीएफच्या 12 तुकड्या सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. संवेदनशील भागांमध्ये बंदोबस्त काल मध्यरात्रीपासूनच तैनात करण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आणि पोलीस सह आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती स्वत: बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत.

11/7 मुंबई बॉम्बस्फोट

 • 11 जुलै 2006 : 7 लोकल ट्रेन्समध्ये बॉम्बस्फोट
 • 189 ठार, 824 जखमी
 • पश्चिम रेल्वेत प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून घडवले स्फोट
 • भाईंदर, बोरिवली, जोगेश्वरी, खार रोड, वांद्रे, माहीम, माटुंगा रोडमध्ये स्फोट
 • संध्याकाळी 6.24 ते 6.35 दरम्यान बॉम्बस्फोट
 • सरकारी पक्षानं 192 साक्षीदार तपासले
 • बचाव पक्षानं 51 साक्षीदार तपासले
 • 8 आयपीएस अधिकारी, 5 आयएएस अधिकारी, 8 डॉक्टरांचा जबाब नोंदवला
 • 5,500 पानांचे पुरावे तपासले

11/7 मुंबई बॉम्बस्फोट : असा शिजला कट

 • मार्च 2006

- लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आझम चिमाच्या पाकमधील घरात कट शिजला

- सिमी आणि लष्कर-ए-तोयबाचे सदस्य बैठकीला हजर

 • मे 2006

- 50 जणांना पाकमधील बहवालपूरमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं

- बॉम्ब तयार करणं, बंदूक चालवणं, चौकशीला भीक न घालण्याचं प्रशिक्षण

 • 25 जून 2006

- हल्लेखोरांना नेपाळ, बांगलादेश, कच्छमार्गे भारतात पाठवलं

 • 27 जून 2006

- 11 अतिरेक्यांना मुंबई उपनगरातल्या 4 वेगवेगळ्या ठिकाणी नेमलं

 • 8-10 जुलै 2006

- एहसान उल्लाहनं 20 किलो आरडीएक्स पाकमधून भारतात पाठवलं

- सांताक्रुझमधल्या 2 दुकानांतून 8 प्रेशर कुकर विकत घेतले

 • 9-10 जुलै 2006

- गोवंडीमध्ये मोहम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये बॉम्ब तयार करण्यात आले

- प्रत्येक कुकरमध्ये 2.5 किलो आरडीएक्स, 4 किलो अमोनियम नायट्रेट भरलं

- स्फोटकं भरलेले कुकर वांद्रे इथं पाठवले

 • 11 जुलै 2006

- अतिरेकी सात ग्रुपमध्ये विभागले

- प्रत्येक अतिरेक्याच्या बॅगमध्ये वर्तमानपत्रात एक प्रेशर कुकर गुंडाळण्यात आला

- कटाप्रमाणे अतिरेक्यांनी लोकलमध्ये चढून घडवले स्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First Published: Sep 11, 2015 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading