S M L

हाच का महाराष्ट्र देशा ?, सोबत जेवला म्हणून मारहाण आणि बहिष्कार !

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2015 05:19 PM IST

हाच का महाराष्ट्र देशा ?, सोबत जेवला म्हणून मारहाण आणि बहिष्कार !

10 सप्टेंबर : राकट देशा...दणकट देशा...महाराष्ट्र देशा...असं अभिमानानं म्हटलं जातं पण अजूनही जातीय द्वेष आणि अस्पृश्यतेच्या खाईत ढकललेल्या मातंग आणि दलितांची अवस्था पाहून मागास देशा...बहिष्कार देशा...अस्पृश्य देशा असंच म्हणावंस वाटतंय. कारण सवर्णांसोबत पंगतीत जेवायला बसला म्हणून तरुणांना मारहाण करण्याची घटना याच महाराष्ट्र देशाच्या नांदेडमध्ये घडलीये. एवढंच नाहीतर याविरोधात पोलिसांत तक्रार केली म्हणून सवर्णांनी गावातल्या मातंग आणि दलित समाजासोबतचे सर्व व्यवहार बंद केलेत. आणि मातंग आणि दलितांचं पाणीही बंद केलंय.

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या सायाळ गावात कृष्णजन्माष्ट्मीचा सण साजरा करण्यात आला. या निमित्ताने बंजारा समाजातर्फे गाव जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मातंग समाजाला देखील निमंत्रण होतं. त्यानुसार सोपान मोरताटे हा युवक कार्यक्रमात गेला. सोपानचा गुन्हा इतकाच की तो उच्च जातीच्या लोकांसोबत जेवायला पंगतीत बसला.

जातीयवाद्याना ही बाब खटकली आणि हणमंत पवार याने त्याला भर पंगतीत मारहाण करून जाती वाचक शिवीगाळ केली. अनेक वर्षांपासून हा जातीद्वेष सहन करणार्‍या सोपान याने या बाबतीत लोहा पोलिसांत तक्रार केली. त्या तक्रारीवरुन हणमंत पवार यांच्या विरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाय.

याच कारणावरुन सवर्णानी मातंग आणि दलितांशी सर्व व्यवहार बंद करून त्यांच्यावर बहिष्कार घातला . दुष्काळग्रस्त लोहा तालुक्यात आधीच पाण्याची टंचाई त्यात सवर्णानी पाणी बंद केल्याने मातंग आणि दलितांवर पाण्यासाठी वनवन भटकायची वेळ आली. ही परिस्थिती ताज़ी असली तरी या सायाळ गावात मागील अनेक वर्षांपासून मातंग आणि दलितांबाबत अस्पृश्यता पाळली जाते.

या आधीही पाण्यावरून महिलांना मारहाण

Loading...

या आधीही नांदेडच्याच हदगाव तालुक्यात चौरंबा गावातही अशा प्रकारची घटना घडली होती. या गावात हाटकर, आदिवासी आणि मातंग समाजाचे लोक राहतात. मातंग समाजाला सार्वजानिक विहिरीवर पाणी भरण्यास मज्जाव करून गावगुंडानी महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली होती.

चौरंबा गावात दुष्काळामुळे मातंग समाजाच्या परिसरातली विहीर आटली. या विहिरीत आता दूषित पाणी असल्याने मातंग समाजातील महिलांना नाइलाजाने हाटकर वाड़यातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी जाव लागलं. पण खालच्या जातीच्या लोकांनी जर विहिरीतून पाणी काढल्यास आम्ही बाटल्या जाऊ असं म्हणत काही लोकांनी महिलांना पाणी भरू दिल नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2015 05:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close