मी राजीनामा देणार नाही - राकेश मारिया

मी राजीनामा देणार नाही - राकेश मारिया

  • Share this:

Rakesh

09 सप्टेंबर : मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची काल (मंगळवारी) अचानक बदली करण्यात आली. या बदलीमुळे मारिया नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच ते राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचंही सांगितलं जात होतं. पण राजीनामा देण्याचा विचार आपण करत नसल्याचं स्वत: मारिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 'माझ्या राजीनाम्यासंबंधीच्या ज्या बातम्या त्या खर्‍या नाही', असंही राकेश मारिया यांनी म्हटलं आहे.

राकेश मारिया यांना काल (मंगळवारी) होमगार्ड विभागाचे पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली होती. तर अहमद जावेद यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तडकाफडकी मारिया यांची बदली करण्यात आल्याने यामागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर राकेश मारियांच्या बदलीमागे शीना बोरा हत्या प्रकरणाचा तपास असल्याचे आरोपही करण्यात आले होते. मात्र मारिया आणि त्यांची टीमच या प्रकरणाचा तपास करतील, असं स्पष्टीकरण राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के. पी. बक्षी यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मारियांच्या बदलीमागे गुजरात-दिल्ली कनेक्शन असल्याचा आरोप केला आहे. मारिया हे या प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहाराचाही तपास करत होते. त्यामुळे भाजपशी संबंधित परदेशात असलेले लोक अडचणीत येण्याची शक्यता होती, तसं होऊ नये म्हणूनच मारियांची बदली केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला.

राकेश मारियांच्या आयुक्तपदाचा कार्यकाळ 30 सप्टेंबरपर्यंतचा होता. पण हा कार्यकाळ फक्त तीन आठवडेच उरला असताना त्यांना आयुक्त पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली. मारिया यांना होम गार्ड्सच्या महासंचालक पदावर बढती देण्यात आली. मात्र हे पद साईड पोस्टींग समजलं जातं. त्यामुळे हे प्रमोशन आहे की पनिशमेंट अशीही चर्चा सुरू आहे.

मारियांची नियुक्ती ही आघाडी सरकारच्या काळात झाली असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे सुर पहिल्यापासूनच फारसे जुळले नाहीत. त्यात मारियांनी ललित मोदींची भेट घेतल्याचं उघड झालं होतं. तसंच बहुचर्चित शीना बोरा प्रकरण सुरू झाल्यानंतर मारिया पुन्हा चर्चेत आले. या प्रकरणात ते स्वत: लक्ष घालून आरोपींची चौकशी करत होते. पण तडकाफडकी बदली केल्यानं मारिया राजीनामा देऊ शकतात, अशा बातम्या येत होत्या. मात्र त्याला आता मारियांनी स्वत:च पूर्णविराम दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: September 9, 2015, 7:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading