सिंहस्थ पर्वणी!, कुंभमेळयातील पहिल्या शाहीस्नानाला सुरुवात

सिंहस्थ पर्वणी!, कुंभमेळयातील पहिल्या शाहीस्नानाला सुरुवात

  • Share this:

Shahi Snanr

29 ऑगस्ट : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणी शाहीस्नानाला आज पहाटे सुरुवात झाली. गोदावरी नदीवरील त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांनी या शाहीस्नानाला सुरुवात केली. हा कुंभ म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणता येईल कारण श्रावण मासात येणारा हा सिंहस्थ कुंभमेळा आपल्याला एक तपाचं पुण्य देऊन जातो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नाशिक रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरमधलं कुशावर्त तिर्थ भाविकांनी सजलं आहे.

ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 वाजून 16 मिनिटांनी जुना, अग्नी आणि आवाहन आखाड्याचे साधू-महंतांनी प्रथम शाहीस्नान केलं. त्यानंतर निरंजन, आनंद, अटल आणि महानिर्वाण या आखाड्यातील साधूंनी शाहीस्नान केलं. या स्नानानंतर सर्व आखाड्याच्या साधूंनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये शाहीमार्गावर नागरीकांनी रांगोळ्यांच्या पायघड्यानी साधू-महंतांचे स्वागत केलं.

सर्वसाधारणपणे नाशिकला सकाळी 9, तर त्र्यंबकेश्वरला सकाळी 10.30 वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धर्मोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकांचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल.

त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर साधू-महंतांचं शाहीस्नान सुरु आहे तसंच, साधू-महंतांचे शाहीस्नान झाल्यानंतर इतर भाविक शाहीस्नान करतील असं पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.

या सिंहस्थ कुंभमेऴयासाठी देशभरातून लाखो भाविक आणि साधू-महंत दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या कुंभमेळ्यादरम्यान चारवेळा शाहीस्नानाचा लाभ मिळणार आहे. श्रावण वद्य अमावास्येला म्हणजे 13 सप्टेंबरला दुसरं शाही स्नान आणि ऋषिपंचमीला 18 सप्टेंबरला तिसरं शाही स्नान होणार आहे. तर 25 सप्टेंबर रोजी शैव संन्याशाचे शाहीस्नान कुशावर्त कुंडात होणार आहे. त्यामुळे एकूणच सध्या त्रंबक आणि नाशिकमध्ये भक्तीमय वातावरण आहे.

दरम्यान, शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण आराखडा शहर पोलिसांनी जाहीर केला आहे. शाही स्नानाच्या दिवशी रामकुंडापर्यंतच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 29, 2015, 8:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading