बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

  • Share this:

maha_bhusan_award

19 ऑगस्ट : अखेर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजभवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते बाबासाहेबांना हा पुरस्कार देण्यात आला. ललित भाषेत इतिहास लिहित असताना खूप अभ्यास करावा लागतो. पण तरीही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त कराव्यात असं म्हणतं मोठ्या जबाबदारीने पुरस्कार स्विकारतो असं पुरंदरे म्हणाले. इतिहासकारांनी अहंकार बाळगू नये. इतिहास हे मौलिक धन आहे आणि त्याचा अपमान करू नका असं आवाहनही पुरंदरेंनी केलं. तसंच बाबासाहेबांनी पुरस्काराची 10 लाखांची रक्कम आणि आपल्याकडील 15 लाख मिळून 25 लाख रक्कम दीनानाथ हॉस्पिटलमधील कॅन्सर रुग्णांना मदत म्हणून देत असल्याचं जाहीर केलं.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रभरात वादाची लाटच उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडने बाबासाहेबांना देण्यात येणार्‍या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला कडाडून विरोध केला. तर मनसे आणि शिवसेनेनं जोरदार समर्थनं केलं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या पुढे जाऊन भूमिकाही मांडली होती. एवढंच नाहीतर पुरस्काराच्या काही तासांआधीही राष्ट्रवादी आणि जिजाऊ बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. या अभूतपूर्व राड्याला चिरडून महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला. संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास 200 निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत राजभवनावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा सुरू झाला. शिवशाहिरांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं औचित्य साधत व्यासपीठावर मेघडंबरीचा देखावा मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुरस्कारांला विरोध करण्याचा खरपूस समाचार घेतला. तर बाळासाहेबांनीही इतिहासकारांना सल्ला दिला.

पूर्ण अभ्यासाअंतीच मी लिखाण केलं -पुरंदरे

इतिहासात चिकित्सा, विश्लेषण, अभ्यास याच दृष्टीकोणातून बघावं आणि याच दृष्टीकोणातून मी इतिहासाकडे पाहिलं. पूर्ण अभ्यासाअंतीच मी लिखाण केलं. इतिहास लिहिण्यासाठीच मी कष्ट घेतले. खरं तर ललित भाषेत इतिहास लिहिताना जास्त अभ्यास करावा लागतो पण तरीही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर दुरस्त कराव्यात. पण, आज गरज आहे ती लोकांच्या भाषेत इतिहास पोहोचण्याची. याच्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. माझ्या पेक्षाही सोप्या भाषेत शिवचरित्र सांगण्याचा प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा पुरंदरेंनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी इतिहासकारांचे कानही टोचले. इतिहासकारांनी अहंकार बाळगू नये. इतिहास हे मौलिक धन असून त्याचा अपमान करू नका असं आवाहन बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. मी आनंदानं, सुखानं आणि जबाबदारीनं पुरस्कार स्विकारतो आणि या पुरस्कारानं माझी जबाबदारी वाढली आहे. मला देण्यात आलेल्या पुरस्काराच्या रक्कमेतून फक्त 10 पैसे घेणार आहे. या पुरस्काच्या 10 लाख रक्कमेत माझ्याकडचे 15 लाख मिळून 25 लाख हे दीनानाथ हॉस्पिटलमधील कॅन्सर रुग्णांना देणार असल्याची घोषणाही बाबासाहेबांनी केली.

महाराज आज असते तर विरोधकांचा कडेलोट केला असता -मुख्यमंत्री

बाबासाहेबांना पुरस्कार दिल्यानं पुरस्काराची उंची वाढली आहे. आम्ही कुणाच्या भीतीमुळे राजभवनात पुरस्कार सोहळा घेतला नाही. मुळात शिवरायांच्या मावळ्यांना कुणाची भीती वाटण्याची गरजच नाही. सर्वोच्च पुरस्कार हे राजभवनातच व्हावेत ही प्रथा आहे. मुळात वाद घालण्यार्‍यांना शिवाजी महाराज कळलेच नाही. वाद घालणार्‍या लोकांनी छत्रपती शिवरायाचं कार्य समजून घ्यावं आणि मग बोलावं. आज जर शिवाजी महाराज असते तर विरोध करणार्‍यांचा कडेलोट केला असता अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच शिवाजी महाराज हे कुशल प्रशासक आणि व्यवस्थापक होते. महाराजांच्या या गुणांवर चित्रपट किंवा मालिका काढणार्‍यांना राज्य सरकार पूर्ण मदत करणार असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

राजनी लावला जावाई शोध -विनोद तावडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी विनोद तावडेंनी हा पुरस्कार बाबासाहेबांना दिला हा जावईशोधच लावला गेला असा टोला विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लगावला. बाबासाहेबांवर करण्यात आलेले आरोप हे अत्यंत तथ्यहीन आहे. बाबासाहेबांचं शिवचरित्र सर्वसमावेशक असून शिवचरित्र घराघरात पोहोचलं. उच्च न्यायालयानंही बाबासाहेबांच्या कार्याला पोचपावती दिली आहे. पण तरीही विरोधकांनी जातीपातीचं राजकारण केलं याला महाराष्ट्रातले सजग नागरिक भुलणार नाहीत असं विनोद तावडे म्हणाले.

बाबासाहेबांना विरोध ही माकडचेष्टा -सुभाष देसाई

बाळासाहेब ठाकरे यांचं बाबासाहेबांवर अपार प्रेम होतं. बाबासाहेबांचं शिवचरित्र ऐकत चार पिढ्या मोठया झाल्यात आहेत. पण तरीही जातीयवाद्यांनी विरोध केला. बाबासाहेबांना विरोध ही माकडचेष्टा होती अशी जळजळीत टीका सुभाष देसाई यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

First published: August 19, 2015, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading