12 मार्च 1993 आणि याकूब !

12 मार्च 1993 आणि याकूब !

  • Share this:

yakub memon30 जुलै : मुंबईच्या किनार्‍यावर अस्वस्थ शांतता होती...डिसेंबर आणि जानेवारीत उसळलेल्या दंगलीत इथं रक्ताचे पाट वाहिले होते. त्यामुळे वरवर दिसणारी ही शांतता वादळापूर्वीचीच होती.. हे वादळ येत होतं याच अरबी समुद्राच्या मार्गाने...फेब्रवारी 1993मध्ये कोकणातल्या शेखाडीच्या किनार्‍यावर आरडीएक्स, एके 56 रायफल्स आणि हँड ग्रेनेड्स रात्रीच्या अंधारात उतरवण्यात आले. प्लॅन होता मुंबईसह 4 शहरांमध्ये साखळी स्फोट घडवून भारतात हाहाकार माजवण्याचा...पण एका स्मगलरला अटक झाल्यामुळे घाईघाईत फक्त मुंबईवर हल्ला करण्याचं ठरलं. आणि शिवजयंतीपर्यंत न थांबता...12 मार्च ही तारीख मुंबईवर हल्ला करण्यासाठी मुकरर करण्यात आली.

शुक्रवार, 12 मार्च 1993....माहिममधल्या अल-हुसैनी बिल्डिंगमध्ये लगबग सुरू होती. दाऊद इब्राहीमचा विश्वासू सहकारी टायगर मेमन आणि त्याचा भाऊ याकूब मेमन यांच्या मालकीचे या बिल्डिंगमध्ये 4 फ्लॅट्स होते. काही दिवसांपूर्वीच कॅश देऊन विकत घेतलेल्या व्हॅन्स आणि स्कूटर्समध्ये आरडीएक्स भरण्याचं काम इथं सुरू होतं. पाकिस्तानात ट्रेनिंग घेऊन आलेले मुंबईकर हे काम शिताफीने करत होते. स्वतंत्र भारतातला सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला.. हे माथेफिरू काही वेळातच करणार होते.. ठरल्याप्रमाणे गाड्या निघाल्या.. ट्रॅफिकमधून मार्ग काढत..जागच्या जागी पोहोचवण्यात आल्या. ठीक दुपारी दीडच्या ठोक्याला..भारताची शान असलेल्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीला पहिला हादरा बसला.. या 28 मजली इमारतीच्या तळाशी पहिला स्फोट झाला आणि गजबजलेला शेअर बाजार एका क्षणात सुन्न झाला.

mumbai blast4या एकाच स्फोटात तब्बल 84 जण मृत्युमुखी पडले आणि 217 जखमी झाले. तरी हा स्फोट ठरलेल्या ठिकाणापेक्षा थोडा दूर झाला होता.. नाहीतर ही अख्खी गगनचुंबी इमारत खाली पाडण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा होता. पुढच्या 2 तासांत मुंबईत एकामागून एक 12 स्फोट झाले.

- 2.15 वाजता नरसी नाथा स्ट्रीटवर झालेल्या स्फोटात 5 जण ठार झाले

- अडीच वाजता दादरच्या शिवसेना भवनासमोर 4 जण ठार झाले तर 50 जखमी झाले

- 2.33 ला एअर इंडियाच्या मुख्यालयाजवळ 20 जण ठार तर 87 जखमी झाले

- पाचवा स्फोट पावणे 3 वाजता माहीम कॉजवेला झाला

- त्याच वेळी वरळीच्या सेंचुरी बाजारात झालेल्या स्फोटात 113 जण ठार झाले तर 227 जखमी झाले

- 3 वाजता झवेरी बाजारात झालेल्या स्फोटात 17 जणांचे जीव गेले

- वांद्र्याच्या सी रॉक हॉटेलात आठवा स्फोट झाला

- दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ झालेल्या स्फोटात 10 जण ठार झाले

- दहावा स्फोट 3 वाजून 20 मिनिटांनी जुहूच्या सेंटॉर हॉटेलात झाला

- अकरावा स्फोट अंधेरीत सहार विमानतळावर झाला

- तर शेवटचा स्फोट 3 वाजून 40 मिनिटांनी विमानतळातल्याच सेंटॉर हॉटेलात झाला

दोन तास 10 मिनिटं चाललेल्या या दहशतीच्या नंग्या नाचात 257 निष्पाप मुंबईकरांना निष्ठूरपणे मारण्यात आलं.. हजारो लोक जखमी झाले होते..सातशेच्या वर लोकांना गंभीर दुखापती झाल्या होत्या. मुंबईभरातल्या हॉस्पिटल्समध्ये जखमींना ठेवण्यासाठी जागा अपुर्‍या

पडल्या. पहावं तिकडे फक्त रक्त आणि रक्त...मृतदेहांचे तर अक्षरशः अवशेष गोळा करून आणावे लागत होते. हा हल्ला जितका अनपेक्षित आणि धक्कादायक लोकांसाठी होता. तितकाच तो पोलिसांसाठीही होता.

mumbai blast 1993पोलिसांनी प्रत्यक्षदशीर्ंच्या माहितीनुसार धरपकड करायला सुरुवात केली. माहीम, भेंडीबाजार, मुलुंड, अंधेरी अशा ठिकाणांहून शेकडो संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार आणि देशाचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी 24 तासांच्या घटनस्थळांची पाहणी केली आणि मुंबईकरांना विश्वास दिला. की हल्ला करणारे सीमेपलिकडचे असले, तरी त्यांना धडा शिकवला जाईल..

त्यावेळी पंतप्रधान राव म्हणाले, "हा तपास आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाईल हे अजून ठाऊक नाही. देशातल्या काही ठिकाणांपर्यंत जावं लागेल.कदाचित देशाबाहेरही जिथपर्यंत तपास जाईल, तिथवर आम्ही त्याचा पाठपुरावा करू."

या महाकाय केसच्या सुनावणीसाठी आर्थर रोड जेलच्या आत विशेष टाडा कोर्टची स्थापन करण्यात आली. 4000 साक्षीदार आणि 38 हजार पुरावे तपासल्यानंतर 15 हजार पानांचा निकाल देण्यात आला. 14 वर्षं चाललेल्या या ऐतिहासिक खटल्यात याकूब मेमनसोबत इतर 11 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या अकरा जणांवर स्फोटकं ठेवल्याचे आरोप सिद्ध झाले होते. पण पुढे हायकोर्टात आणि नंतर सुप्रीम कोर्टात याकूब सोडून सर्वांची फाशी रद्द करण्यात आली.

ज्यांनी अंमलबजावणी केली, ते पकडले गेले, पण ज्यांनी कट रचला, ते मुख्य आरोपी...दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन अजूनही भारतीय तपास संस्थांच्या हाताबाहेर आहेत. ते पाकिस्तानात असल्याचा साधार संशय आहे.

पण, दाऊद, टायगर आणि याकूब यांनी मुळात हे स्फोट का घडवून आणले, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 6 डिसेंबर 1992ला अयोध्येत हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद पाडली आणि देशभरात अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. मुंबईत तर अक्षरशः वणवा पेटला. डिसेंबर 1992 आणि जानेवरी 1993 मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीत 900 जणांचे जीव गेले. यातले पावणे सहाशे मुस्लीम होते. पण केवळ बाबरी आणि दंगलींचा बदला घेणं, हे या स्फोटांचं मुख्य उद्दिष्ट नव्हतं. बदला घेण्यासाठी उतावीळ झालेल्या माथेफिरूंचा पाकिस्तानने वापर करून घेतला आणि नव्याने उभ्या रहात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या हृदयस्थानावरच हल्ला केला.

 

पळकुट्या याकूब

मुंबईत साखळी स्फोट होण्याच्या एक दिवस आधी 11 मार्च 1993 ला याकूब अब्दुल रझाक मेमन आपल्या कुटुंबासह दुबईला पळून गेला. 12 मार्चच्या दिवशी त्याच्याच माहिममधल्याच घरातून..आरडीएक्सने भरलेल्या गाड्या मुंबईभर पाठवण्यात आल्या. त्यातली एक गाडी त्याच्या बहिणीच्या नावावर होती. याच वरळीतल्या गाडीमुळे पोलीस याकूबपर्यंत पोहोचू शकले. तो पेशाने चार्टड अकाऊंटंट होता आणि नावारूपालाही आला होता. पण ज्या मुंबईने त्याला भरभरून दिलं.. त्याच मुंबईला बेचिराख करण्यासाठी त्याने आपला सगळा पैसा आणि शक्ती खर्च केले.

मुंबईत स्फोट कसे घडवायचे, हे ठरवण्यासाठी दुबईत मीटिंग झाली होती. त्यात दाऊद, टायगर, आयएसआयचे अधिकारी यांच्यासोबत याकूब सहभागी होता. पुढे त्याने दहशवाद्यांच्या ट्रेनिंगचा आणि शस्त्रास्त्रांचा सगळा खर्चही उचचला. त्याचे आयएसआयशी संबंध सिद्ध झाले होते, असं गुप्तचर संस्थेचे तेव्हाचे प्रमुख व्ही.जी. वैद्य म्हणतात, "पाकला गेला, पश्चातापाचा पुरावा नाही."

yakub1

दीड वर्षानंतर 6 ऑगस्ट 1994 ला अटक करण्यात आली. याकूब मेमन काठमांडूहून दिल्लीला पोहोचला, विमानतळावरच सीबीआयने त्याला अटक केली. त्याने सरेंडर केलं आणि तपासात मदत केली म्हणून त्याची शिक्षा कमी करा, अशी मागणी झाली. पण याचा एकही पुरावा कोर्टासमोर कधीही आला नाही. याकूब आजारी आहे, म्हणून त्याला फाशी देऊ नका, अशीही मागणी होऊ लागली. तेव्हा पीडितांचे कुटुंबीय संतापले.

257 जणांना ठार करणार्‍या या अतिरेक्याला फाशी द्या. असा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने 3 वेळा केला. तरीही त्याला वाचवण्यासाठी कोर्टात अनेक याचिका येतच होत्या. फाशीच्या काही तासांअगोदरही याकूबचा फाशी रद्द करण्यासाठी अट्टहास सुरूच होता. पण, न्यायव्यवस्थेनं याकूबच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. आज 22 वर्षांनंतर याकूबला फासावर लटकवण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

First published: July 30, 2015, 2:43 PM IST

ताज्या बातम्या