याकूबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त

याकूबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त

  • Share this:

nagpur central jail

29 जुलै : सर्वोच्च न्यायालयाने आज(बुधवार) 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. या पार्श्वभूमीवर नागपूरसह मुंबईतही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नागपूर सेंट्रल जेलला तर छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून काही जणांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर याकूबला गुरुवारी सकाळी 7 वाजता नागपूर सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहात सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, तुरुंगाच्या 500 मीटर परिसरातही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मेडिकल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं एक पथकही तुरुंगात दाखल झालं असून दोन अँम्ब्युलंसही दाखल झाल्या आहेत. तसंच याकूबच्या फाशीनंतर 3 नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नागपूरप्रमाणेच मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. फाशीच्या पार्श्वभूमीवर कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस दल पूर्णपणे तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सर्व संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांच्या सुट्‌ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई सुरू झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: July 29, 2015, 9:41 PM IST

ताज्या बातम्या