एटीसी टॉवर अतिरेक्यांचं सॉफ्ट टार्गेट ; सुरक्षा मात्र रामभरोसे !

एटीसी टॉवर अतिरेक्यांचं सॉफ्ट टार्गेट ; सुरक्षा मात्र रामभरोसे !

  • Share this:

जागृती चंद्रासोबत राहुल झोरी, मुंबई.

22 जुलै : मुंबई विमानतळावरचं एटीसी टॉवर (एअर ट्रॅफिक कंट्रोल) असुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती IBN लोकमतच्या हाती लागली आहे. आणि या अतिशय महत्त्वाच्या टॉवरवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असं पत्र विमानतळाच्याच सुरक्षा अधिकार्‍यांनी लिहिलंय. हे पत्र IBN लोकमतच्या हाती लागलंय. जीव्हीके नावाच्या ज्या कंपनीला मुंबई विमानतळ हाताळण्याचं कंत्राट देण्यात आलंय, त्यांच्या जुजबी उत्तरांनी सुरक्षा अधिकारी अजिबात समाधानी नाहीयेत. पण यामुळे मुंबईचं संवेदनशील विमानतळ धोक्यात आलंय.

mumbai air traffic control towerमुंबईतलं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ...दिवसाला 850 विमानं इथं उड्डाण आणि लँडिंग करतात. अक्षरशः काही सेकंदांच्या अंतरावर इथे विमानं उतरतात. आणि टायमिंगचं हे क्लिष्ट काम होतं. या एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरवर. पण IBN लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार..संवेदनशील शहरातलं हे अतिमहत्त्वाचं टॉवर असुरक्षित आहे. होय..ऑक्टोबर 2013 मध्ये उद्घाटन झालेला हा टॉवर दहशवाद्यांच्या हल्लाचा शिकार होऊ शकतो, अशी भीती विमानतळाचे सुरक्षाविषयक अधिकारी कॅप्टन एस के मलिक यांनी व्यक्त केलीये. टॉवरच्या तिन्ही बाजूंनी फक्त 10 मिटरच्या अंतरावर कार पार्किंग आहे. नियमांनुसार हे पार्किंग 100 मीटरच्या पलिकडे पाहिजे. त्यामुळे अतिरेकी कारमध्ये स्फोटकं आणू शकतात, अशी भीती आहे. त्यांनी नोव्हेंबर 2014मध्ये लिहिलेलं हे गोपनीय पत्र आरटीआय कार्यकर्ते विश्वास भांबुरकर यांनी मिळवलंय.

मुंबई विमानतळाची ऑपरेटर कंपनी जीव्हीके यांनंी मलिक यांच्या पत्राला उत्तर देत दावा केलाय की हा टॉवर सुरक्षित आहे. आयबीएन लोकमतच्या हाती असलेल्या या पत्रात जीव्हीकेने म्हटलंय की, सर्व कार्सची सुरक्षा तपासणी केली जाते आणि कार पार्किंग काही महिन्यांत दुसरीकडे हलवण्यात येणार आहे. पण जुलै 2015मध्येही पार्किंग एटीसी टॉवरच्या भोवतीच आहे, असं आम्हाला आढळलं.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि जीव्हीके या प्रश्नातून मार्ग काढत आहेत, असं सूत्रांनी सांगितलंय. पण मार्ग निघेपर्यंत धोका कायम आहे, असं भारतीय विमानतळ प्राधिकरणातल्या सूत्रांनी आयबीएन लोकमतला सांगितलंय. त्यांचं म्हणणं आहे की, "प्रत्येक गाडी कसून तपासली तरी धोका कायम असतो, कारण कार पूर्णतः तपासणं सध्या शक्य नाहीये. नवं पार्किंग होईपर्यंत जो हंगामी प्लॅन जीव्हीकेने केलाय, तो हल्ला परतवण्यास पुरेसा नाहीये."

मुंबई विमानतळ दहशतवाद्यांच्या कायमच हिटलिस्टवर आहे. आज परिस्थिती अशी आहे की, एखादा अतिरेकी आपल्या कारमधून स्फोटकं एटीएस टॉवरच्या थेट पायथ्यापर्यंत घेवून जाऊ शकतो. याची दखल केंद्र आणि राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावी, ही अपेक्षा.

Follow @ibnlokmattv

First published: July 22, 2015, 10:28 PM IST

ताज्या बातम्या