'कळवण्यास आनंद होतो की, आमची मुलगी मेली'; जिवंतपणी मुलीचा दशक्रिया विधी !

'कळवण्यास आनंद होतो की, आमची मुलगी मेली'; जिवंतपणी मुलीचा दशक्रिया विधी !

  • Share this:

20 जुलै : जातीपातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या पोटच्या मुलीचा ती जिवंत असताना दशक्रिया विधीचं पोस्टर लावण्याचा संतापजनक प्रकार धुळे जिल्ह्यात घडलाय. धुळ्यातल्या कासारे गावच्या अविनाश तोरवणे यांच्या मुलीनं प्रेमविवाह केला. त्यामुळे संतापलेल्या तोरवणे यांनी तिच्या दशक्रिया विधीचं चक्क पोस्टर लावलंय. त्यासाठी संपूर्ण गावाला निमंत्रण दिले होते. शरमेची बाब म्हणजे त्यासाठी गावात होर्डिंग लावून 'कळवण्यास आनंद होतो की, मुलगी मेली...' असा मजकूरही छापला. अखेर मुलीनेच याविरोधात आवाज उठवत पालकांविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली.

dhule dashkirya4तोरवणे यांच्या 19 वर्षांच्या मुलीने प्रेमविवाह केला. मात्र, यामुळे मोठ्या मुलीच्या लग्नात अडसर येईल, या रागाने तोरवणे कुटुंबाने मुलीला विरोध केला. परवानगी न घेता केलेल्या लग्नाचा राग इतका होता की, कुटुंबासाठी मुलगी मेली, हे जाहीर करून तिचं क्रियाकर्म करण्याचं ठरवलं. या प्रकाराने व्यथित झालेल्या मुलीने मात्र हिंमत गोळा करून पालकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केलाय.

शनिवारी संध्याकाळपासून या मुलीच्या दशक्रिया विधीचे निमंत्रण व्हॉटस्‌ऍप तसंच सोशल नेटवर्कवर फिरत होते. स्वतःच्या इच्छेने विवाह करणार्‍या या मुलीची बदनामी करण्याचा हा कट होता. त्यामुळे तिच्यासह सासरच्यांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या निमंत्रणपत्रिकेमध्येही 'कुमारी तोरवणे (मराठे)हिचे वयाच्या 19व्या वर्षी दुपारी 12.20 वाजता दुःखद निधन झाल्याचे कळवण्यास आनंद होतो,' असे निर्दयी शब्द होते. ही पोस्ट रविवारी संध्याकाळी 'व्हायरल' झाल्यावर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी शोध घेऊन धुळ्यातील हे गाव शोधून काढलं.

पोलिसांनी पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले, मात्र मुलीच्या वडिलांनी फोनवरून माफी मागतो, असं सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याची तयारी दर्शवली. या प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावून पोलिसांनी मुलीच्या नातलगांनाही कडक शब्दांत समज दिली. हे क्रियाकर्म केले तर अंनिसचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून निषेध नोंदवतील, असा इशारा देण्यात आला.

पोलिसांच्या मदतीने हा प्रकार हाणून पाडला असला,तरी जातींतर्गत दहशतवादाचा चेहरा समोर आला आहे, असं जातपंचायतविरोधी अभियानाचे समन्वयक कृष्णा चांदगुडे यांनी अधोरेखित केले.सोशल नेटवर्किंग तसेच 'अंनिस'मुळे हे प्रकरण पुढे आले. या मुलीने धैर्याने स्वतः या प्रकाराची माहिती दिली, त्यामुळे वेळीच पालकांना समज देण्यात आली. या प्रकाराची चर्चा सुरू झाल्याने पालक बडोद्याला निघून गेले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2015 04:30 PM IST

ताज्या बातम्या