14 जुलै : आयपीएलच्या सहाव्या हंगामात स्पॉट फिक्सिंग करून भारतीय क्रिकेट सृष्टी काळीमा फासणार्यांचा आज (मंगळवारी) फैसला झाला. चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही टिम्सवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आलीये. तसंच राजस्थान रॉयल्सचे सहमालक आणि शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आलीय. तर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवास यांचा जावई गुरूनाथ मय्यपनवरही आजीवन बंदी घालण्यात आलीय.
2013 साली झालेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट सृष्टीला मोठा हादरा बसला होता. आज दोन वर्षानंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती लोढा समितीने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. यावेळी लोढा यांनी कठोर शब्दात दोषींवर ताशेरे ओढले. चेन्नई सुपर किंग्जचे गुरू नाथ मय्यप्पन, आयपीएलचे माजी सीईओ सुंदर रामन आणि राजस्थान रॉयल्सचे राज कुंद्रा यांच्यावर स्पॉट फिक्सिंग करणे किंवा त्यात मदत करण्यासह इतरही आरोप आहेत. या प्रकरणी गुरूनाथ मय्यप्पन आणि राज कुंद्रा या दोघांनाही दोषी ठरवण्यात आलाय. दोघांवरही आजीवन बंदी घालण्यात आलीये. तसंच गुरुनाथ मय्यप्पन सीईओ असलेल्या चेन्नई सुपरकिंग्सवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आलीये. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचंही 2 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय.
स्पॉट फिक्सिंग प्रकरण
- 16 मे 2013 - श्रीसंथ, चांडिला आणि अंकित चव्हाणला अटक
- 21 मे 2013 - अभिनेता विंदू दारा सिंगला अटक
- 24 मे 2013 - गुरूनाथ मय्यप्पनला मुंबईत अटक
- 28 जुलै 2013 - मैयप्पन आणि राज कुंद्रांना बीसीसीआयच्या समितीकडून क्लीन चिट
- 30 जुलै 2013 - बीसीसीआयच्या चौकशी समितीची स्थापना बेकायदेशीर, मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा
- 13 सप्टेंबर 2013 - श्रीसंथ आणि चव्हाणवर बीसीसीआयची आजन्म बंदी
- 08 ऑक्टोबर 2013 - सुप्रीम कोर्टाकडून न्या. मुकुल मुद्गल समितीची स्थापना
- 03 नोव्हेंबर 2014 - मुद्गल समितीचा अहवाल सुप्रीम कोर्टाकडे सादर
- 22 जानेवारी - सुप्रीम कोर्टाकडून माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना
Follow @ibnlokmattv |