महिला आणि बालकल्याण खात्याची 'लोह'युक्त चिक्की!

महिला आणि बालकल्याण खात्याची 'लोह'युक्त चिक्की!

  • Share this:

chikki bannerer

03 जुलै : अंगणवाडीतल्या मुलांना लोह मिळावं, यासाठी महिला आणि बालकल्याण खात्याने चिक्की पुरवठा सुरू केला. पण या चिक्कीमध्ये चक्क लोखंडाचे तुकडे आणि लोखंडाच्या पट्‌ट्या आढळत आहेत. म्हणजे महिला आणि बालकल्याण खातं शब्दश: लोहाचा पुरवठा करत आहेत, असंच म्हटलं पाहिजे. राज्यातल्या अनेक ठिकाणांहून अशा तक्रारी येत आहेत. अमरावतीतील संभू अंगणवाडीत आज चिक्कीमध्ये लोखंडी रिंग सापडली. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधल्या एका अंगणवाडीत राजगिरा चिक्कीमध्ये लोखंडी पट्टी सापडली होती. तर अहमदनगरमध्ये वाळू आणि माती मिश्रीत चिक्की जप्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही सर्व चिक्की ही सूर्यकांता सहकारी संस्थेने वितरित केलेली आहे.

अमरावती जिल्ह्यात टाकरखेडा संभू अंगणवाडीमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे. महिला आणि बालकल्याण खात्याकडून संभू अंगणवाडीत वितरित करण्यासाठी काल (गुरुवारी) ही चिक्की आली होती. तिचं आजच वितरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना बोलावलं. सर्व पालकही जमले. पण, सरपंचांनी जेव्हा चिक्कीचं पहिलंच पाकिट उघडलं तर त्यात लोखंडी रिंग सापडली. पालकांनी ही चिक्की घ्यायला नकार दिला आहे. तसंच ही चिक्की सील करण्यात आली आहे. सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्थेला चिक्की पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे.

त्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यात एका अंगणवाडीत शालेय पोषण आहारात दिल्या जाणार्‍या चिक्कीत ब्लेड सदृश्य धातूची पट्टी आढळली होती. चोपडा तालुक्यातल्या धानोरा गावात ही अंगणवाडी आहे. दोन वर्षांच्या चिमुकलीनं ही चिक्की खाल्ली आणि रडायला लागली. शिक्षिकेने जेव्हा तपासलं तर तिच्या चिक्कीमध्ये धातूची पट्टी आढळली. सुदैवाने त्या मुलीला गंभीर इजा झाली नाही. पण या प्रकारामुळे पालकांमध्ये घबराट उडाली होती.

अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेनं चार लाख माती मिश्रीत चिक्कीची पाकिटं जप्त केली आहेत. चिक्कीचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात साधारण चिक्कीची आठ लाख पाकिटंं वाटप करण्यात आली होती. मात्र चिक्कीत भेसळ आढळल्यानं चार लाख पाकिटं जप्त करण्यात आली. मुलांना थेट चिक्कीतून लोह म्हणजेच लोखंडाचा पुरवठा होत असल्यानं महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा टीकेच्या धनी ठरल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: July 3, 2015, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading