लिखित आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घ्यायला निवासी डॉक्टरांचा नकार

लिखित आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घ्यायला निवासी डॉक्टरांचा नकार

  • Share this:

mardasdy

02 जुलै : संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांच्या 90 टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तरीही डॉक्टरांचा संप सुरूच आहे. लिखित हमी मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, अशी मार्डच्या डॉक्टरांची भूमिका आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मार्डच्या संपकरी डॉक्टरांची भेट घेतली. या बैठकीत डॉक्टरांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. डॉक्टरांची सुरक्षा वाढवून देण्याचं आपण मान्य केलं असून जर निवासी डॉक्टरांवर हल्ला झाला तर स्वत: त्या मेडिकल कॉलेजचे डीन संबंधित डॉक्टरांसोबत जाऊन पोलिसांत गुन्हा नोंदवतील, असं तावडेंनी सांगितलंय. शिवाय जर मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया 'मॅटर्निटी लीव्ह' भरपगारी द्यायला तयार असेल तर सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करेल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे. विद्या वेतनातही 5000 रुपयांची वाढ मान्य करण्यात आली आहे. राज्यात 2278 निवासी डॉक्टर आहेत. त्यांच्या विद्यावेतनावर दरवर्षी 117 कोटी रुपये खर्च होत असतो, असंही तावडे यांनी सांगितलं.

दरम्यान या मागण्या सरकार लिखित स्वरूपात देणार आहे, असं तावडे यांनी सांगितलं. तावडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा संपकरी डॉक्टर आणि तावडे यांची बैठक झाली. सरकारने लिखित स्वरुपात आश्वासन दिल्यावर मार्डची केंद्रीय समिती यावर विचार करेल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तोवर हा संप सुरूच राहणार आहे. डॉक्टरांच्या संपाचा आज (गुरुवारी) पहिला दिवस होता. रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बर्‍याच त्रासाला सामोरं जावं लागलं. अनेक शस्त्रक्रिया खोळंबल्या. पण, संपाचा पहिलाच दिवस असल्याने त्याचे फारसे परिणाम झाले नाही. उद्याही संप सुरूच राहिला तर मात्र परिस्थिती अधिक चिघळू शकते.

Follow @ibnlokmattv

First published: July 2, 2015, 10:23 PM IST

ताज्या बातम्या