दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ग्रीस ठरला पहिला प्रगत देश

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ग्रीस ठरला पहिला प्रगत देश

  • Share this:

greece crisis02 जुलै : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या कर्जाचा पहिला हप्ता देण्याची मुदत काल संपली. अशा पद्धतीने कर्जाची परतफेड करू न शकणारा ग्रीस पहिला प्रगत देश ठरलाय. रविवारच्या सार्वमतानंतर ग्रीस दिवाळखोरीत निघतो, युरोपीय संघाबाहेर पडतो की रशियाकडे झोळी पसरतो, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय. या पूर्ण घडामोडींचा परिणाम थेट भारतावरही होऊ शकतो.

ग्रीस म्हटलं की, आपल्यासमोर येतात मेडिटेरियन समुद्रातली नयनरम्य बेटं...ग्रीस म्हणजे चंगळ.. ग्रीस म्हणजे शांतता.. पण आताची ग्रीसमधली शांतता आहे वादळापूर्वीची. येत्या रविवारी इथं सार्वमत घेण्यात येणार आहे. युरोपीय महासंघ देऊ करत असलेल्या नव्या सशर्त पॅकेजला स्वीकारायचं की नाही, हे लोक ठरवणार आहेत. त्याला नाही म्हणणारे आणि हो म्हणणारे राजधानी ऍथेन्समध्ये वेगवेगळे मोर्चे काढत आहेत. नवं पॅकेज स्वीकारलं, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला तात्पुरतं इंजेक्शन मिळेल, पण लोकांवर आणखी कडक आर्थिक निर्बंध लादले जातील. सार्वमत होईपर्यंत बँकेतून पैसे काढण्यावरही मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी एटीएम्ससमोर रांगा लावल्या. पेन्शनवर कुर्‍हाड कोसळणार, या विचाराने वयोवृद्धांची झोप उडाली आहे.

"परिस्थिती आधीच वाईट होती. ती आज आणखी बिघडलीये. उद्या काय होईल माहीत नाही." "माझ्याकडे पुरेसे युरो नाहीयेत, आणि औषधं विकत घ्यायची आहेत." अशी व्यथा इथले स्थानिक मांडत आहे.

सत्ताधारी डाव्या सरकारचे पंतप्रधान ऍलेक्सिक सिप्रास आर्थिस निर्बंधांच्या विरोधात आहेत. किंबहुना हाच मुद्दा घेऊन ते निवडून आले. पण आता त्यांच्यासमोर पर्याय नसल्यामुळे त्यांनी चेंडू जनतेच्या कोर्टात टाकलाय.

2004 साली ऍथेन्समध्ये शानदार ऑलिंपिक सोहळ्याचं आयोजन झालं होतं, तेव्हापासूनच त्यांच्या अर्थव्यस्थेला घरघर लागली होती. पण त्यांनी वेळीच उपाय न करता लपवाछपवी केली. त्यामुळे, हजारो वर्षांपासून जगाला विज्ञान-तत्त्वज्ञानाची देणगी देणार्‍या ग्रीक लोकांवर आता अक्षरशः जगासमोर भीक मागण्याची वेळ आलीये. युरोपाने याआधीच ग्रीसमध्ये अब्जावधी युरो ओतले आहेत. यापुढे युरोपी महासंघाने मदत नाकारली, तर रशिया आणि चीनकडे कर्ज मागण्याशिवाय ग्रीससमोर पर्याय नसेल. आणि युरोपीय बाजार कोसळले, तर त्याचा परिणाम पूर्ण जगावर आणि अर्थातच काही प्रमाणात भारतावरही होऊ शकतो.

 दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

- रविवारी ग्रीसच्या लोकांनी सशर्त पॅकेजला होकार दिला, तर मोठा पेचप्रसंग तात्पुरता टळू शकेल

- लोकांनी सशर्त पॅकेजला नकार दिला, तर ग्रीस युरोपीय महासंघाच्या बाहेर पडू शकतो

- रशिया किंवा चीन मदत करेल का, याची पंतप्रधान सिप्रास यांच्याकडून चाचपणी

- रशिया, चीन युरोपात जम बसवतील, या कल्पनेने जर्मनी, फ्रांसमध्ये अस्वस्थता

- ग्रीसवर एकूण 320 बिलियन युरो म्हणजे तब्बल रु. 22,551 अब्ज एवढं कर्ज

- परतफेड टाळण्यासाठी ग्रीसने दिवाळखोरी घोषित केली, युरोपच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार

- भारताच्या युरोपशी असलेल्या व्यापारसंबंधांमुळे भारतावरही थोडाफार परिणाम शक्य

- ग्रीसचं संकट गंभीर रूप धारण करत असताना भारतीय बाजार अस्थिर झाले

Follow @ibnlokmattv

First published: July 2, 2015, 9:37 AM IST

ताज्या बातम्या