ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 1 अब्ज 70 कोटींचं कर्ज फेडण्यास नकार

ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 1 अब्ज 70 कोटींचं कर्ज फेडण्यास नकार

  • Share this:

greece 4301 जुलै : कला-संस्कृतीने नटलेल्या ग्रीसवर आर्थिक संकट ओढावलंय. ग्रीस आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलंय. ग्रीसनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जाचा पहिला हप्ता देण्यास नकार दिला आहे. आज या कर्जाचा 1 अब्ज 70 कोटी डॉलर्सचा पहिला हप्ता भरायचा होता. पण, अर्थमंत्री यानीस व्हेरूफेकीस यांनी हा हप्ता भरणार नसल्याची घोषणा केली. ग्रीसच्या या घोषणेमुळे त्यांची अर्थव्यवस्था पुरती अस्थिर झाल्याचं मानलं जातंय. मात्र, अजूनही ग्रीसला अधिकृतरित्या दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आलेलं नाही.

आंतरराष्ट्रीय कर्जपुरवठादारांनी ग्रीसला 8 अब्ज 10 कोटी डॉलर्सचं बेलआऊट पॅकेज देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी ग्रीसवर आर्थिक सुधारणा करण्यासाठी कठोर अटी लादल्या आहेत. या अटी आपल्याला मान्य नसल्याचं ग्रीसचे पंतप्रधान ऍलेक्सिस सिप्रास यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळेच त्यांनी 5 जुलै रोजी देशात सार्वमत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच आता कर्जाचा पहिला हप्ता फेडण्यास नकार देऊन ग्रीसनं युरोपियन महासंघ आणि जागतिक अर्थव्यवस्थेला संकटात टाकल्याचं दिसतंय. सध्या ग्रीसवर जीडीपीच्या 177 टक्के कर्ज आहे. म्हणजेच प्रत्येक 100 युरोच्या उत्पन्नामागे ग्रीसवर 177 युरो कर्ज आहे.

'एटीएममधून फक्त 60 युरो'

नाणेनिधीचं कर्ज फेडायला ग्रीसनं नकार दिल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये घबराट उडाली आहे. अस्वस्थ नागरिकांनी बँकांच्या एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी आजही गर्दी केली. ग्रीसनं काल आठवड्याभरासाठी बँका बंद करायचा निर्णय घेतला आहे. तसंच एटीएममधून प्रत्येकाला एका दिवशी फक्त 60 युरो काढता येणार आहेत. मात्र, ज्या वृद्ध नागरिकांकडे एटीएम कार्ड्स नाहीत, त्यांनी पैसे काढण्यासाठी बंद बँकांकडे धाव घेतली.

जर्मनीकडून चर्चेसाठी दार खुले

दरम्यान, ग्रीसनं कर्जाचा हप्ता न फेडण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी जर्मनीनं अजूनही चर्चेसाठी तयार असल्याचे संकेत दिले होते. जर्मनीच्या चँसेलर अँजेला मर्केल यांनी बर्लिनमध्ये कोसोवोचे पंतप्रधान इसा मुस्तफा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ग्रीससाठी चर्चेचे दरवाजे अजूनही खुले असल्याचं म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

First published: July 1, 2015, 9:46 AM IST

ताज्या बातम्या