अखेर २४ तासांनंतर मुंबईची वाहतूक हळूहळू पुर्वपदावर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2015 12:04 PM IST

अखेर २४ तासांनंतर मुंबईची वाहतूक हळूहळू पुर्वपदावर

 

mumbai rain 19 june20 जून :: मुंबई आणि परिसरात पावसाने जोरदार धुमशान घातल्यामुळे आज मुंबईची लाईफलाईन दिवसभर खोळंबली. अखेर संध्याकाळी मुंबईची लाईफलाईन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पश्चिम रेल्वे हळूहळू पुर्वपदावर येत आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर मध्य रेल्वे सुरू करण्यात येईल असं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय. रस्ते वाहतूक सुरू झालीये मात्र, गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी कायम आहे. दरम्यान, वडाळा परिसरात विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाला. 60 वर्षांच्या रणजित गुप्ता आणि 5 वर्षांच्या गौरव कर्णिकचा दुर्देवी मृत्यू झाला. बेस्टनं खबरदारी म्हणून अनेक भागांतला वीजपुरवठा खंडित केलाय.

मुंबईकरांसाठी आजचा दिवस 26 जुलैच्या आठवणी ताज्या करून देणारा ठरला. गुरुवारी संततधार पावसामुळे मुंबईकरांची सकाळ

तुंबलेल्या पाण्याने झाली. मध्यरात्री झालेल्या धोधो पावसामुळे मुंबईनगरी पाण्यात गेलीये. मुंबईत मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे समुद्राला 3.94 मिटर उंच भरती आल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. मध्यरात्रीपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलंय. सायन, विद्याविहार, कुर्ला, चेंबुर, कल्याण, डोंबिवली भागात पाण्याचे तळेच निर्माण झाले. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची सीएसटी ते कल्याण वाहतूक ठप्प झालीये. तर पश्चिम मार्गावर अंधेरी ते चर्चगेट वाहतूक ठप्प झालीये. रेल्वे ठप्प झाल्यामुळे ऐन सकाळी ऑफिसला निघालेल्या चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुफान गर्दी तर उसळलीच. पण, रस्ते वाहतूक जाम झाली.

बेस्ट आली धावून पण...

Loading...

रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे बेस्टतर्फे 250 जादा गाड्या सोडण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या जादा गाड्याही सोडण्यात आल्यात. मात्र, ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झालीये. रेल्वे ठप्प असल्यामुळे सर्वसामान्यांनी बेस्ट आणि टॅक्सीकडे मोर्चा वळवला. त्यामुळे बसेस गर्दीने भरून धावत होत्या. सकाळी रेल्वे ठप्प झाल्यामुळे अनेक चाकरमान्याना आज ऑफिसला दांडी मारावी लागली.

उद्या शाळांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे महापालिकेने महत्वाचे काम असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन केल्यामुळे अनेक मुंबई करांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. खबरदारीचा उपाय म्हणून मुलांना शाळेत पाठवू नका, महत्वाचं काम असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन मुंबई पालिका आयुक्तांनी केलंय. ठाण्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी जाहीर केला. तर आज आणि उद्या मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित कोल्हापूर दौरा रद्द करून तातडीने मुंबई महापालिकेकडे धाव घेतली. पालिकेच्या आपत्ती कक्षात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेनेनंही आपल्या सुवर्णमहोत्सवी दिनानिमित्त कार्यक्रम रद्द केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2015 10:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...