अखेर रिक्षाचालकांचा संप मागे, परिवहन आयुक्तांशी सकारात्मक चर्चा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2015 06:49 PM IST

Auto Rickshaw

17 जून : मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आपला संप मागे घेतला आहे. रिक्षा- टॅक्सी चालक संघटनांनी संप मागे घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या संपामुळे नागरिकांचे हाल होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. काही वेळापूर्वीच परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावतेंनी रिक्षातून प्रवास करत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.

राज्यभरातील रिक्षाचालकांनी आज संप पुकारला होता.कायद्यानुसार मान्यता नसतानाही व्यवसाय करणार्‍या 'ओला' 'उबेर' या टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालावी, हकीम समिती पुन्हा स्थापन करून त्या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकाराव्यात आणि रिक्षा-टॅक्सीचालकांना 'सार्वजनिक कर्मचार्‍या'चा म्हणजेच पब्लिक सर्व्हट्सचा दर्जा द्यावा, या मागण्यांसाठी मुंबई ऑटो रिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने आज संप पुकारला होता.

वर्षभर सेवा देणार्‍या रिक्षाचालकांनी न्यायाच्या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्याच्या हेतूने एक दिवस रिक्षा बंद ठेवली, तर परिवहन आयुक्तांना रिक्षा चालकांच्या प्रश्नांची जाणीव असल्याचं चर्चेनंतर मुंबई ऑटो रिक्षा- टॅक्सीमेन्स युनियनच्या शशांक राव यांनी सांगितलं.

मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स संघटना ही रिक्षाचालकांमधील सर्वात मोठी संघटना असल्याने राज्यभरात या बंद आंदोलनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, परिवहन आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर रिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनच्या शशांक राव यांनी रिक्षा चालकांचा संप मागे घेतल्याचे स्पष्ट केले.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2015 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...