13 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेला आता संगीतकार अजय-अतूलची साथ मिळाली आहे. मेक इन इंडिया मोहिमेसाठी जगभरातील उद्योजकांसमोर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अजय अतुलने संगीत दिले आहे. ऐवढ्या महत्त्वाच्या कामासाठी आमची निवड होणे ही गौरवास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया अजय - अतूलने दिली आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांच्या दौर्यावर आहेत. या दौर्यात मोदींनी 'मेक इन इंडिया' मोहिमेला चालना देण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे. काल (रविवारी) मोदींनी जर्मनीतील हॅनोव्हर इथे जगभरातून आलेल्या उद्योजकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा कार्यक्रम सादर झाला. 15 मिनीटाच्या या कार्यक्रमात विविध संस्कृतीने नटलेल्या भारताची आधुनिकीकरण आणि 'मेक इन इंडिया' मोहिमेपर्यंतची वाटचाल दाखवण्यात आली. या कार्यक्रमासाठी संगीत देण्याची जबाबदारी अजय - अतूलवर सोपवण्यात आली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
पंतप्रधान कार्यालयाच्या कार्यक्रमात संगीतकार म्हणून आमची निवड होणे हे गौरवास्पद बाब होती असं मत अजय - अतूलने IBN लोकतशी बोलताना व्यक्त केलं. या कार्यक्रमात भारतातील विविध नृत्यप्रकारही सादर करण्यातं आलं होतं. याशिवाय लेझर शोद्वारे साकारलेला मेक इन इंडिया मोहिमेतील वाघ हा कार्यक्रमाचा वैशिष्ट्य ठरला.
Follow @ibnlokmattv |