मराठी चित्रपटांना आता 'प्राईमटाइम'!

मराठी चित्रपटांना आता 'प्राईमटाइम'!

  • Share this:

multiplex

07 एप्रिल :  महाराष्ट्रातील मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये (संध्याकाळी 6 ते 9) एक मराठी चित्रपट दाखवणं आता बंधनकारक झालं आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे ही घोषणा केली असून चित्रपटापूर्वी राष्ट्रगीतासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची माहिती देणारी एक चित्रफित दाखवली जाईल असेही त्यांनी जाहीर केले आहे.

मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये मराठी चित्रपटांना जागा दिली जात नाही अशी ओरड गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मराठी सिनेनिर्माते आणि कलाकारांनी यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार पाठपुरावा करेल, असंही आश्वासन विनोद तावडेंनी यावेळी दिलं. गेल्या आठवड्यात राज्यातील कला संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाबद्दल विधानसभेत चर्चा झाली. त्यावर आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंनी उत्तर देत, मल्टीप्लेक्स चालकांना दणका दिला आहे.

गृहखात्याच्या कायद्यानुसार मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे ठराविक शोज दाखवणं सध्या बंधनकारक आहे. पण ते कधी दाखवावेत, यावर बंधन नाही. पण यापुढे मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत एक स्क्रीन मराठी सिनेमासाठी राखीव ठेवावी लागेल, अशी सरकारची भूमिका आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीतून या प्रस्तावाला विरोध होत आहे. याशिवाय ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांचं स्मारक बांधण्यात येईल. तसंच शाहीर साबळे यांच्या नावाने नवा पुरस्कार सुरु करणार असल्याची माहिती विनोद तावडे यांनी दिली.

दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख, निर्माते-दिग्दर्शक रवी जाधव यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबईत पहिला चॉईस हिंदी चित्रपटांना असल्यामुळे मराठी चित्रपटांना स्पर्धेत टिकणं कठीण होते, असं मत रितेश देशमुखने मांडलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, ट्विटरवर अनेकांनी या निर्णयाविषयी नाराजीही व्यक्त केली.

Follow @ibnlokmattv

First published: April 7, 2015, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading