महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला, शाहीर साबळे काळाच्या पडद्याआड

महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला, शाहीर साबळे काळाच्या पडद्याआड

  • Share this:

sahir sable20 मार्च : मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपलाय. महाराष्ट्राची लोकधारा आणि 'जय जय महाराष्ट्र' महाराष्ट्राभिमान गीतातून महाराष्ट्राची महती पोहचवणारे शाहीर साबळे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शाहीर म्हणून त्यांनी मोलाचं योगदान दिलं.

जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि महाराष्ट्राची लोकधारा या प्रयोगांसाठी त्याची ओळखले जात. गीतकार, गायक, ढोलकी वादक तसंच नाटककारही होते. महाराष्ट्राची लोकधारातून मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केला. असाहा बुलंद आवाज हरपलाय. शाहीर साबळे यांच्यावर उद्या दुपारी शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार होणार आहे.

"गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा.."' हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणारे कलावंत म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर मूळचे सातारा जिल्ह्यातल्या, वाई तालुक्यातील पसरणी गावचे, जन्म 1923 चा. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचं बाळकडू मिळालं. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा साने गुरूजींशी संपर्क आला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

1942 ची स्वातंत्र्य चळवळ, गोवा आणि हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांमध्ये शाहीर साबळेंनी महाराष्ट्र गाजवून सोडला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या चळवळीत लोकजागृती करण्यात महत्वांचं योगदान होतं हे शाहिरांच्या गाण्यांचं. लोकनाट्यात बदल करून त्यांनी मुक्तनाट्य निर्माण केलं. त्यांनी लिहिलेल्या मुक्तनाट्यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरील पहिला प्रयोगही त्यांनी केला.त्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं तर सर्व विक्रम मोडून काढले.

1954-55 मध्ये एच.एम.व्ही. चे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले ते शाहीर साबळेंच. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोकगीतं गोळा करून त्यांनी त्याचं जतन केलं. पद्मश्री, संगित नाटक अकादमीच्या पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 'माझा पवाडा' हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

साबळे हे फक्त शाहीर नव्हते ते उत्तम कवी होते, ढोलकीवादक होते. अभिनेते होते मराठी रंगभूमीवर गाणं कसं पाहिजे, तर शाहीर साबळेंसारखं अशी पावती पु. ल. देशपांडे यांनी त्यांना दिली होती. महाराष्ट्राचा हा बुलंद आवाज आता शांत झाला तरी त्यांच्या पोवाड्यांचे सूर कायम गर्जत राहणार आहेत. महाराष्ट्राच्या या लोकशाहीराला आयबीएन-लोकमतची श्रद्धांजली.

शाहीर साबळेंचा अल्पपरिचय

पूर्ण नाव- कृष्णराव गणपतराव साबळे

सातार्‍यातल्या पसरणी गावात शेतकरी कुटुंबात जन्म

वडील माळकरी, आई ओव्या रचणारी, गाणारी

आईवडिलांकडून गाण्याचा वारसा

भजनी मंडळात गाता गाता बासरीचा थंद

अमळनेरला पुढचं शिक्षण

तिथे सानेगुरुजींच्या सहवासात आले

स्वातंत्र्य चळवळीत साने गुरूंजीसोबत दौरे केले

1942 मध्ये शाहीर शंकरराव निकम यांच्याकडून शाहिरीचे धडे घेतले

हैद्राबाद मुक्ती संग्रामात प्रचाराचे रान

जातीयवाद की समाजवाद हा पहिला पोवाडा- 1947 मध्ये

आधुनिक मानवाची कहाणी- पुस्तकरुपानं पोवाडा प्रसिद्ध

आंधळं दळतंय- मुक्त नाट्य

महाराष्ट्राची लोकधारा-

शाहीर साबळे यांची गाजलेली गीतं

 जय जय महाराष्ट्र माझा - महाराष्ट्राभिमान गीत

- अरे कृष्णा, अरे कान्हा

- आठशे खिडक्या नऊशे दारं

- विंचू चावला

- दादला नको गं बाई

- या विठूचा गजर हरिनामाचा

- पयलं नमन

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2015 06:49 PM IST

ताज्या बातम्या