16 मार्च : मेट्रो-3 वरुन शिवसेनेनं लावून धरलेला विरोधी सूर मावळण्याची चिन्हं दिसत आहेत. 'मेट्रो-3' प्रकल्पामुळे गिरगावातील एकाही रहिवाशाला विस्थापित होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी काल (रविवारी) उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या समाधानाचं प्रश्नच नाही, स्थानिकांचं समाधान झाल्यावरच अंतिम भूमिका ठरवू, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे आता स्थानिक रहिवाशी आणि एमएमआरसीच्या पदाधिकार्यांची आज (सोमवारी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर येत्या 18 मार्च रोजी शिवसेनेकडून 'गिरगाव बंद'ची हाक देण्यात येणार आहे.
मेट्रो-3 ला शिवसेनेने विरोध केल्यानंतर एमएमआरसीच्या अधिकार्यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना 'मेट्रो-3' प्रकल्प समजावून सांगितला तसंच या प्रकल्पाला विरोध न करण्याची विनंती केली. त्याचबरोबर गिरगावातून एकही मराठी माणूस विस्थापित होणार नाही याची ग्वाही एमएसआरसीच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. दरम्यान, प्रकल्पासाठी पाडण्यात येणार्या इमारतींमधील रहिवाशांचे शक्यतो याच भागात पुनर्वसन करण्यात येईल, असंही अश्विनी भिडे यांनी या वेळी स्पष्ट केले.
मराठी माणसाच्या मुळावर येणारा प्रकल्प होऊ देणार नाही. जिथे मराठी माणसाचे हक्काचे घर आहे तिथेच त्याला घर देऊन विकास करा, अन्यथा मेट्रो रेल्वे प्रकल्प उखडून टाकू, असा इशारा शिवसेनेने दिला होता. यानंतर मेट्रो प्रकल्पाच्या अधिकार्यांनी तातडीने उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विरोध न करण्याची विनंती केली.
मेट्रो-3 साठी मराठी माणसाचं विस्थापन होणार नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मेट्रो-3 परिसरामुळे बाधित होणार्या 777 नागरिकांचं पुनर्वसन त्याच परिसरात करुन देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Follow @ibnlokmattv |