वसई-विरारमध्ये विकलं जातंय विषारी पाणी !

वसई-विरारमध्ये विकलं जातंय विषारी पाणी !

  • Share this:

vasai water news05 मार्च : वसई-विरार शहरांमधल्या तीव्र पाणीटंचाईने एका नव्या काळ्या धंद्याला जन्म दिला आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने बनावट मिनरल वॉटरच्या बाटल्या विकणर्‍यांची चलती झाली आहे. फक्त पैसे कमावण्यासाठी मिनरल वॉटरच्या नावाखाली सर्रास विषारी पाणी विकलं जात असल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीये. एवढंच नाहीतर थोडे थोडके नाहीतर तब्बल 200 हून जास्त अनधिकृत प्लांट वसई-विरार मध्ये राजरोसपणे सुरू आहेत. यातले काही प्लांटस् तर गटाराच्या बाजुला आहेत. तर काहींमध्ये शौचालयातून पाणी घेतलं जातंय.

वसई-विरार परिसरातील अनेक चाळी, औद्योगिक वसाहतीत पॅकेजिंग मिनरल वाटरच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात गोरखधंदे सुरू झाले आहेत. बोअरिंगचं, टँकरचं किंवा विहिरीचं पाणी सेन्टॅक्सच्या टाकीत साठवून त्यात केमिकल मिक्स केलं जातं. आणि हेच पाणी शुद्ध करुन बाटल्यात भरून मिनरल वॉटरच्या नावाखाली तीस ते पस्तीस रुपये दराने बाजारात विकले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीये. बोअरिंगचे पाणी प्रोसेस करुन शुद्ध बनविल्या जाते आणि विकले जाते. राजरोसपणे चालणारा हा धंदा नागरिकाच्या आरोग्याशी खेळत आहे.

या कंपन्यांचे इतके विदारक चित्र आहे की, या प्लांटमध्ये कमालीची अस्वच्छता आहे. काही प्लांट गटाराच्या बाजूला आहेत. काहींनी पाण्याचे स्त्रोत शौचालयातून घेतले आहेत. काही ठिकाणी तर कपडे धुणे, आंघोळ करणे असे प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ अहोरात्र प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू आहे.

वसई विरारमध्ये मिनरल वॉटरच्या नावाखाली चालू असलेल्या कंपन्यांना दर्शनीय भागावर कुठेही फलक नाही. आय.एस.आय.चा मार्क नाही, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा (बिआयएस) कोड नाही, तसंच एफडीएच परवानगी नाही, तरीही केवळ पाणी शुद्ध असल्याचे भासवून मिनरल वॉटरच्या नावाखाली पाण्यावर गोरख धंदा करणार्‍या शेकडो कंपन्या वसई, विरार, नालासोपारामध्ये आहेत.

या संदर्भात अन्न व प्रशासन विभागाला दिलेली माहिती ही अतिशय खळबळजनक आहे. या विभागाने सांगितलं की, वसई विरारमध्ये केवळ 4 कंपन्यांना परवाने देण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात 200 हून अधिक कंपन्या सुरू आहेत. याबाबत कारवाईसाठी कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे करून या विभागाने पळवाटा शोधल्या आहेत. पण वसई विरार परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा चाललेला खेळ खंडोबा कधी थांबणार याचे कोणतेही उत्तर या विभागाकडे नाही. मात्र, असं निकृष्ठ दर्जाचं पाणी पिल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतंय. त्यांना पाण्यापासून होणारे आजार डायरिया, किडनीचे आजार, होतात. नागरिकांनी या बाबत सावध राहावं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2015 04:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading