कॉम्रेड पानसरेंना अखेरचा सलाम

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 21, 2015 08:31 PM IST

कॉम्रेड पानसरेंना अखेरचा सलाम

govind pansare lala salam21 फेब्रुवारी : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, कॉम्रेड गोविंद पानसरे यांना आज (शनिवारी) कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या काठावर अखेरचा निरोप देण्यात आला. कामगार, श्रमिकांसाठी लढा देणारं कॉम्रेड पानसरे नावाचं एक वादळ अखेर शमलंय. हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या या लढवय्या नेत्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

कोल्हापूरमधल्या पंचगंगा घाटावर कॉम्रेड पानसरेंना अखेरचा लाल सलाम देण्यात आला. पानसरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी, हजारो कार्यकर्ते पंचगंगा घाटावर जमले होते. कुठल्या कर्मकांडाविना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निग वॉकवरुन येत असताना त्यांच्यावर अज्ञात इसमांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. पानसरे दाम्पत्याला तातडीने कोल्हापूरमधील एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. चार दिवस गोविंद पानसरे यांच्यावर उपचार सुरू होते. तर उमा पानसरे यांना गोळी चाटून गेल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र पानसरे यांना दोन गोळ्या लागल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर पण गंभीर होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं. गेल्या पाच दिवसांपासून पानसरे यांनी मृत्यूशी झुंज दिली पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. काल 10 वाजून 45 मिनिटांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडल्यानंतर पानसरे यांचं पार्थिव विशेष विमानाने कोल्हापूरला नेण्यात आलं. आपल्या या लढवय्या नेत्यांना अखेरचा सलाम करण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले होते. कोल्हापुरात पार्थिव दाखल झाल्यानंतर 2 तास दसरा चौकात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर पंचगंगा घाटापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर सहभागी झाले होते. आपल्या या लढवय्या नेत्याला निरोप देतांना त्यांचा वारसा, लढा पुढे चालू ठेवण्याची शपथ घेत कार्यकर्त्यांनी लढवय्या योध्याला अखेरचा निरोप दिला.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2015 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...