लढवय्या नेता हरपला, गोविंद पानसरे यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2015 07:25 PM IST

लढवय्या नेता हरपला, गोविंद पानसरे यांचं निधन

21 फेब्रुवारी :ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन झालंय. गेल्या पाच दिवसांपासून पानसरे यांनी मृत्यूशी झुंज दिली पण त्यांचीही झुंज अखेर अपयशी ठरलीये. रात्री 10 वाजून45 मिनिटांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये या लढवय्या नेत्याने अखेरचा श्वास घेतला. फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांचं निधन झालं अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. पानसरे यांचं पार्थिव उद्या सकाळी 10.30 वाजता कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून पुरोगामी महाराष्ट्र आज एका लढवय्या नेत्याला मुकलाय.

आजचा दिवस पुरोगामी महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरलाय. कामगारासाठी आयुष्य वेचणारे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील सागरमळा परिसरात त्यांच्या राहत्या घराजवळ भ्याड हल्ला झाला होता. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे मॉर्निग वॉक करून घरी परतत होते त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी दुचारीवरून येऊन त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गोविंद पानसरे यांना दोन गोळ्या लागल्या तर उमा पानसरे यांना एक गोळी चाटून गेली. पानसरे यांना एक गोळी मानेजवळ लागली तर दुसरी गोळी पोटात लागली होती. त्यांना आणि उमा पानसरे यांना तातडीने कोल्हापूरच्या ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. पण रक्तस्त्रावर झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर होती. चार दिवस त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये उपचार सुरू होते.

आज दुपारी पुढील उपचारासाठी एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आलं. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, रात्री पावणे दहा वाजता पानसरे यांची प्रकृती खालावली. फुफ्फुसामध्ये रक्तस्त्राव झाल्याची बाब समोर आली. रक्तस्त्राव झाल्यामुळे श्वसन नलिका बंद पडली. श्वसन नलिका बंद पडल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले पण यश आले नाही अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. शनिवारी सकाळी पानसरे यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर 10.30 वाजता पार्थिव कोल्हापूरला एअर ऍम्ब्युलन्सने नेण्यात येणार आहे. कोल्हापुरच्या दसरा चौकात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहे.

 गोविंद पानसरे यांनी गेली पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कोल्हापूरवर शोककळा पसरलीये. कार्यकर्त्यांच्या अश्रूचा बांध फुटलाय. आमचा लढवय्या कॉम्रेड, आमचे अण्णा आम्हाला सोडून गेले अशी भावना व्यक्त करत आहे. धक्कादायक म्हणजे या पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमीत दीड वर्षांपूर्वी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर असाच भ्याड हल्ला झाला होता. पानसरे यांच्या निधनामुळे पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्रात काळा दिवस उजाडलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2015 12:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close