पानसरे हल्लाप्रकरण; संशयितांची स्केच तयार

  • Share this:

Pansare

20 फेब्रुवारी : कॉ. गोविंद आणि उमा पानसरे यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपींचे अद्याप धागेदोरे लागले नसले, तरी पोलिसांनी हल्लेखोरांची रेखाचित्रं तयार केली आहेत. उमा पानसरेंना ही रेखाचित्र दाखवल्यावर त्यांनी ओळखल्यास ही रेखाचित्र प्रसिद्ध केली जाणार आहेत. तर पोलिसांनी ज्या 3 मोटारसायकल्स जप्त केल्या आहेत, त्या बेवारस स्थितीत असल्यानं त्यांच्या मुळ मालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

5 दिवसांपूर्वी सकाळी फिरायला जाताना पानसरे दाम्पत्यावर बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पानसरेंवरच्या हल्ल्याला 5 दिवस उलटले तरी हल्लेखोर अजूनही पोलिसांच्या जाळ्यात सापडले नाहीत. हल्लेखोरांना एका 12 वर्षांच्या मुलानं पाहिलं असल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. पण उमा पानसरेंचा जबाब अजून नोंदवला नाहीये, आज त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

त्याशिवाय, पोलिस आता दोन शक्यतांवर आपला तपासाची पुढची दिशा ठरवत आहेत. जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ आणि नथुराम गोडसे आणि हिंदुत्ववादी संघटनेविरुद्ध पानसरेंना सावंतवाडी आणि नागपुरात केलेल्या प्रखर भाषणांचा या हल्ल्याशी काही संदर्भ आहे का? याचा ही तपासला आता केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पानसरे दांपत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर काल रात्री पोलिसांनी पानसरे यांच्या घरातील काही कागदपत्रं आणि साहित्याचीही तपासणी केली असून तपासाबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे.

दरम्यान, तपास पथकांनी कोल्हापूर जिल्ह्यात याआधी सुपार्‍या घेऊन खून केलेल्या प्रकरणांची छाननी करत त्याच्याशी संबंधित सर्वांची कसून चौकशी करण्यात आली आहे. दुसरीकडे, हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी बुधवारीच मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोल्हापुरात दाखल झाली असून ते स्वतंत्रपणे तपास करत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2015 09:27 AM IST

ताज्या बातम्या