आबा अनंतात विलीन

आबा अनंतात विलीन

  • Share this:

RR_Patil_pass away456317 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे लाडके आबा...आर.आर.पाटील यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. आबांच्या

पार्थिवावर त्यांच्या जन्मभूमी अंजनीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आबांच्या तिन्ही मुलांनी पार्थिवाला अग्नी दिला. पोलिसांनी बंदुकीच्या फैर्‍या झाडून आबांना अखेरची सलामी दिली. 'अमर रहे अमर रहे' आर.आर.पाटील अमर रहे' च्या घोषणांनी हेलिपॅड मैदान भावपूर्ण झालं. राजकीय नेते, लाखो गावकरी आणि अवघ्या महाराष्ट्राने आज या आपल्या लाडक्या आबांना साश्रू नयनाने अखेरचा निरोप दिला. आबांच्या अखेरच्या इच्छेनुसार दहावा, तेरावा हा कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे 19 तारखेला अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम अंजनीगावात ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले तिथेत अस्थीविसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, सोज्ज्वळ नेता आणि प्रखर वक्ता अशी ओळख असलेल्या आबांचं सोमवारी तोंडाच्या कर्करोगामुळे अकाली निधन झालं. आबांच्या अकाली एक्झीटमुळे महाराष्ट्र पोरका झाला. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादीभवनात अंत्यदर्शनानंतर आबांचं पार्थिव सकाळी सात वाजता त्यांच्या मुळ गावी अंजनीत दाखल झालं. आबांचं पार्थिव पोहचताच गावकर्‍यांच्या अश्रूंचा बांध फुटला. ज्या आबांना लहानाचं मोठं होताना पाहिलं, त्यांचा जीवनसंघर्षाला जवळून ज्यांनी अनुभवला अशा त्यांच्या सहकारी, कार्यकर्त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले.

भिलवाडी नाक्यापासून ते अंजनी गावातील हेलिपॅड मैदानापर्यंत आबांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत आबांच्या समर्थकांची अलोट गर्दी लोटली होती. आपल्या या लाडक्या नेत्याला,सहकार्‍याला अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वपक्षीय नेतेही उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, हसन मुश्रीफ, संजयकाका पाटील, नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांत पाटील, माणिकराव ठाकरे, भास्कर जाधव, पद्मसिंह पाटील आणि अण्णा हजारेही उपस्थित होते. आबांनी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जावून त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभारली. सामान्य लोकांसाठी आबांनी आपलं आयुष्य वाहून दिलं, जो रस्ता त्यांनी निवडला होता, त्या रस्त्यानं मार्गक्रमण करणं हीच आबांना खरी श्रध्दांजली असेल अशी भावना यावेळी शरद पवारांनी व्यक्त केली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2015 03:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading