केजरीवाल जिंकले, मग हरले कोण?- शिवसेना

Samruddha Bhambure | Updated On: Feb 11, 2015 10:55 AM IST

केजरीवाल जिंकले, मग हरले कोण?- शिवसेना

Uddhav in samana

11 फेब्रुवारी :   दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाही असं भाजपच्या लोकांना वाटतं. पण जर, हा पराभव नरेंद्र मोदींचा नाही तर मग तो नक्की कोणाचा? केजरीवाल जिंकले, मग हरले कोण?, असा टोला शिवसेनेने आपल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.

दिल्लीत आम आदमी पार्टीने 70 पैकी 67 जागा जिंकत भाजपचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका होत असताना आता त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही भाजपला लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (मंगळवारी) पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्याचीच री ओढत आज (बुधवारी) शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.

दिल्लीकर जनेतेने 'आप'च्या केजरीवालांचा 'झाडू' हातात घेऊन भाजपचा कचरा केला. मोदींचे ब्रम्हास्त्र आणि शहांची जादू चालली नाही. शिवाय केवळ घोषणा आणि भाषणांवर निवडणूक जिंकता येत नाही. महाराष्ट्रातही ते घडले नाही व दिल्लीने तर सत्तेची यंत्रणाच साफ झुगारून दिली आहे, अशी टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.

प्रत्येक वेळेला पक्षातील कार्यकर्त्यांवर बाहेरचे उमेदवार व निर्णय लादता येत नाहीत हा पहिला धडा आणि मतदारांना गृहीत धरता येत नाही, हा दुसरा धडा या निवडणुकीने दिला असल्याचा टोलाही या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

केजरीवाल जिंकले, मग हरले कोण?, असा खोचक सवालही शिवसेने विचारला आहे. दिल्लीतील संपूर्ण प्रचार यंत्रणा मोदींच्याच नावाने राबवली गेली. त्यामुळे दिल्लीतील पराभव हा मोदींचाच असल्याचंही या अग्रलेखात म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने लाटेचा दावा केला होता. या लाटेत पाणी किती होते आणि फेस किती होता, हे येणारा काळच ठरवेल.

आतापर्यंत विजय स्वीकारलात, तसे पराभवही स्वीकारा. पराभवातून काही शिकता आल्यास पाहा. जमल्यास चिंतनही करावे, असा सल्लाही शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2015 09:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close